‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार


सामना ऑनलाईन । दुबई

आशिया कप क्रिकेट स्पर्धेत विजयाच्या हॅटट्रिकचा पराक्रम करणारा हिंदुस्थान हा एकमेव संघ होय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ रविवार, 23 सप्टेंबरला पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला भिडणार आहे. बुधवारी गटसाखळी फेरीतही ‘टीम इंडिया’ने पाकिस्तानचा दारूण पराभव केला होता. मात्र तरीही उद्या पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक न करता रोहितची सेना विजयाच्या चौकारासह स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी सज्ज झाली आहे.

हिंदुस्थानला दुबळय़ा हाँगकाँगने सलामीच्या लढतीत विजयासाठी झुंजविले होते, मात्र, पाकिस्तानचा धुव्वा उडवून ‘टीम इंडिया’ची गाडी पुन्हा सुस्साट सुटली. बांगलादेशलाही त्यांनी डोके वर काढण्याची संधी दिली नाही. मात्र पाकिस्तानचा संघ जखमी वाघासारखा ‘टीम इंडिया’वर प्रतिहल्ला करण्यासाठी उत्सुक असेल. हे दोन पारंपरिक संघ किताबी लढतीत पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे. तरीही विजयाची लय कायम ठेवून मनोबल उंचावण्याचा हिंदुस्थानी खेळाडूंचा इरादा आहे.

रोहित शर्मा व शिखर धवन ही सलामीची जोडी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मधल्या फळीत अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक यांनीही आपली उपयुक्तता सिद्ध केलीय. सर्वात अनुभवी महेंद्रसिंग धोनीने बांगलादेशविरुद्ध 37 चेंडूंत 33 धावांची खेळी करून हात साफ करून घेतला. केदार जाधवनेही अष्टपैलू कामगिरीने स्वतःची दहशत निर्माण केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानला अफगाणिस्तानने विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत झुंजवले. अनुभवी शोएब मलिकने 51 धावांची खेळी केली म्हणून पाकिस्तानला विजय मिळविता आला.

गोलंदाज फॉर्ममध्ये
वर्षभरानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱया रवींद्र जाडेजाने बांगलादेशविरुद्ध 4 बळी टिपण्याचा पराक्रम केलाय. पाकिस्तानला जाडेजापासून सावध राहावे लागणार आहे. कारण त्याच्यामध्ये फलंदाजीतही मॅचविनिंग खेळी करण्याची क्षमता आहे. याचबरोबर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह या वेगवान जोडगोळीसह युजवेंद्र चहल व कुलदीप यादव या फिरकीपटूंमध्येही पाकिस्तानला आपल्या तालावर नाचविण्याची क्षमता आहे.

आशिया कप क्रिकेट स्पर्धा
सामन्याची वेळ – सायंकाळी 5 वाजता
थेट प्रक्षेपण – ‘स्टार स्पोर्टस्’ वाहिनीवरून

summary- india vs pakistan match on sunday