आफ्रिकेचा सुफडा साफ करण्यासाठी विराट सेना सज्ज

सामना ऑनलाईन । सेंच्युरियन

सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर होणाऱ्या सामन्यात विजय मिळवत टी-२० मालिका सिल करण्याच्या उद्देशाने विराट सेना बुधवारी मैदानावर उतरणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जोहान्सबर्ग येथे रंगला होता. या सामन्यात हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा २८ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.

विराट मोडणार विवियन रिचर्ड्स यांचा मोठा विक्रम?

कसोटी मालिका १-२ अशी गमावल्यानंतर हिंदुस्थानने एक दिवसीय मालिकेत यजमानांना धूळ चारली होती. सहा सामन्यांच्या मालिकेतमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऐतिहासिक प्रदर्शन करत आफ्रिकेवर ५-१ असा मोठा विजय मिळवला होता. आता विराट कोहलीची नजर टी-२० मालिका जिंकण्याकडे असणार आहे. एक दिवसीय मालिका आणि पहिल्या टी-२० सामन्याप्रमाणे या सामन्यातही टीम इंडियाची फिरकी गोलंदाजी आफ्रिकेची ‘विकेट’ घेण्यासाठी तयार आहे. तर आफ्रिकेचा संघ आजचा सामना जिंकत मालिकेतील रंगत कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

फिरकीची जोडी परतणार
एक दिवसीय मालिकेत आफ्रिकेच्या फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवणारी सुपरहिट जोडी सेंच्युरियनच्या सामन्यात परतणार आहे. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात कुलदीप यादवला आराम देण्यात आला होता. मात्र सेंच्यूरियनचे मैदान फिरकीसाठी पोषक असल्याने त्याचे संघात पुनरागमण झाले आहे. कुलदीपने एक दिवसीय मालिकेत १७ बळी घेत आयसीसी क्रमवारीत १५ वे स्थान मिळवले होते.

विराटवर असणार नजर
एक दिवसीय मालिकेमध्ये धावांच पाऊस पाडणाऱ्या कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. पहिल्या टी-२०मध्ये २६ धावा करणाऱ्या विराटकडून आजच्या सामन्यात मोठी खेळीची अपेक्षा आहे. आफ्रिका दौऱ्यामध्ये १ हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला आणखी १३० धावांची गरज आहे. वेस्ट इंडिजचे महान खेळाडू व्हीव्हीएन रिचर्डस यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा विराट दुसरा खेळाडू होऊ शकतो.

२ हजारी मनसबदारी
तसेच टी-२० सामन्यांमध्ये २ हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी विराटला फक्त १८ धावांचा आवश्यकता आहे. आतापर्यंत त्याने ५६ टी-२० सामन्यात १९८२ धावा ठोकल्या आहेत. यात १८ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटच्या आधी मार्टिन गप्टील (२२५०) आणि ब्रँडन मॅक्यूलम (२१४०) या दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

… तर विराट आऊट, राहुल इन
गेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झालेल्या कोहलीने मैदान सोडले होते, मात्र आजच्या सामन्यात तो खेळणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. टीम इंडियाने आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास विराटला २४ फेब्रुवारीला होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. विराटच्या जागेवर के.एल. राहुलला संघात स्थान दिले जाईल.

सेंच्यूरियनवर ‘चौथा’ सामना
दक्षिण आफ्रिकेच्या दीर्घ दौऱ्यात हिंदुस्थानचा संघ सेंच्युरियनच्या मैदानावर चौथ्यांदा खेळणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना या मैदानावर झाला होता आणि यात आफ्रिकेने हिंदुस्थानवर १३५ धावांनी विजय मिळवला होता. कसोटी मालिकेनंतर झालेल्या सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि सहावा सामनाही याच मैदानावर झाला. या दोन्ही सामन्यात हिंदुस्थानने अनुक्रमे ९ आणि ८ विकेटने विजय मिळवला होता. विजयी सामन्यात फिरकी गोलंदाज चहलने पाच बळी घेतले होते, तर विराटने नाबाद १२९ धावांची खेळी केली होती. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न विराट सेनेच असणार आहे.