धवनचे शतक, लंकेचे पुनरागमन; हिंदुस्थान ६ बाद ३२९

सामना ऑनलाईन । पालेकेले

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघामध्ये सुरू असलेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना पालेकेले येथे सुरू आहे. हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३२९ धावा केल्या आहेत. खेळ थांबला तेव्हा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा १३ धावांवर तर हार्दिक पांड्या १ धावांवर खेळत होता.

नाणेफेक जिंकल्यानंतर हिंदुस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहलीचा प्रथम फलंदाजीची निर्णय सलामीवीर केएल राहुल आणि शिखर धवन या जोडीने सार्थ ठरवला. राहुल आणि धवनने आक्रमक फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी ३९.३ षटकांत १८८ धावांची सलामी दिली. शतकाच्या जवळ आल्यानंतर केएल राहुल बाद झाला. पुष्पकुमाराने त्याला बाद केले. राहुलने १३५ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांसह ८५ धावा केल्या. लंकेविरुद्ध पहिल्या डावात अर्धशतकासह राहुलने सलग ७ अर्धशतके झळकावण्याचा विक्रम केला आहे.

लोकेश राहुलचं सलग ७वं अर्धशतक, विश्वविक्रमाची केली बरोबरी

राहुल बाद झाला तेव्हा धवन शतकाच्या उंबरठ्यावर होता. धवनने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये चौकर ठोकत शतक पूर्ण केले. कसोटीमध्ये धवनचे हे ६ वे शतक आहे. शतकानंतर धवन आणखी १९ धावा करून बाद झाला. धवनने १२३ चेंडूत १७ चौकारांसह ११९ धावांची आक्रमक खेळी केली. धवन पुष्पकुमाराचा दुसरा बळी ठरला. धवन बाद झाल्यानंतर संघाच्या धावसंख्येत १० धावांची भर पडत नाही तोच चेतेश्वर पुजाराही ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी मोठी भागिदारी करण्याचा प्रयत्न केला, मात्र पुष्पकुमाराने रहाणेचा त्रिफळा उडवत सामन्यातील तिसरा बळी मिळवला. रहाणेने १७ धावांचे योगदान दिले.

हिंदुस्थानचे सर्वोत्तम ‘अष्टपैलू’ खेळाडू

अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर कोहली आणि आर. अश्विनने ३२ धावांची भागिदारी केली. अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेल्या कोहलीला संदकनने बाद केले. बाद होण्यापूर्वी कोहलीने ८४ चेंडूत ४२ धावा केल्या. कोहलीनंतर अश्विनही ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर साहा आणि पांड्याने दिवसअखेर आणखी पडझड न होऊ देता संघाची धावसंख्या ३२९ पर्यंत पोहोचवली. साहा १३ धावांवर तर हार्दिक पांड्या १ धावांवर खेळत आहे. लंकेकडून पुष्पकुमराने तीन फलंदाजांना बाद केले, तर संदकनने २ आणि फर्नांडोने एक बळी मिळवला.

हिंदुस्थानला ८५ वर्षांनंतर इतिहास घडवण्याची संधी

पहिल्या दिवशी १८८ धावांची सलामी होऊनही लंकेने सामन्यात पुनरागम केल्याने सामन्याचा दुसरा दिवस महत्त्वाचा असणार आहे. दुसऱ्या दिवशी हिंदुस्थान चारशे धावांचा टप्पा पार करण्याचा प्रयत्न करेल तर श्रीलंका हिंदुस्थानला लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल. पहिले दोन्ही कसोटी सामने गमावल्यानंतर लंकेचा प्रयत्न तिसरी कसोटी जिंकत शेवट गोड करण्याचा असणार आहे. तर हिंदुस्थान तिसऱ्या कसोटी विजयासह ८५ वर्षांनंतर विदेशात सलग तीन कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

कसोटीत सर्वाधिक द्विशतक ठोकणारे ५ खेळाडू

कसोटीत सर्वाधिक त्रिशतक ठोकणारे ५ खेळाडू