हिंदुस्थानचा मालिका विजयाचा निर्धार, आज पुण्यात दुसरी टी-20 लढत

अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणाऱया सलामीच्या टी-20 क्रिकेट सामन्यात अखेर टीम इंडियाने बाजी मारत नववर्षाचा विजयारंभ केला. लढतीत जोरदार पुनरागमन करूनही श्रीलंकेला विजयाने हुलकावणी दिली. उद्या (दि. 5) उभय संघ पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर दुसऱया टी-20 लढतीत भिडणार आहेत. हार्दिक पांडय़ाच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ लागोपाठच्या विजयासह आधीच मालिका खिशात घालून निश्चिंत होण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे तीन सामन्यांच्या या मालिकेतील आव्हान राखण्यासाठी पाहुण्या श्रीलंकेला कुठल्याही परिस्थितीत जिंकावेच लागणार आहे. टी-20 क्रिकेटसाठी गहुंजेची खेळपट्टी अनुकूल आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना पुन्हा एक चुरशीची लढत बघायला मिळणार आहे.

मुंबईत झालेल्या पहिल्या लढतीत टीम इंडियाकडून इशान किशन, कर्णधार हार्दिक पांडय़ा, दीपक हुडा, अक्षर पटेल यांनी फलंदाजीत योगदान दिले. शिवम मावीने 4 विकेट घेत पदार्पण साजरे केले. उमर मलिकनेही पंजूष गोलंदाजी करीत 2 विकेट घेतल्या. हर्षल पटेलने 2 विकेट घेण्यासाठी 41 धावा मोजल्या. पांडय़ाला विकेट मिळाला नाही, पण त्याने 3 षटकांत केवळ 12 धावा देत उपयुक्त गोलंदाजी केली. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव व संजू सॅमसन हे आघाडीचे फलंदाज पहिल्या लढतीत अपयशी ठरले. उद्या ते धावा करण्यासाठी भुकेले असतील.

श्रीलंकेकडून कसुन राजिथा वगळता इतर गोलंदाजांनी अचूक मारा करीत हिंदुस्थानी फलंदाजांना वर्चस्व गाजवू दिले नाही. गहुंजेच्या खेळपट्टीवरही श्रीलंकन गोलंदाज टीम इंडियाला रोखू शकतात. या संघात बहुतांश नव्या दमाचे खेळाडू आहेत. श्रीलंकेकडे स्टार खेळाडू नसले तरी कुठल्याही संघावर विजय मिळविण्याची क्षमता या संघात नक्कीच आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत टीम इंडियाचे पारडे जड वाटत असले तरी श्रीलंकेला कमी लेखून चालणार नाही, हेही तितकेच खरे.

22 महिन्यांनंतर पुण्यात आंतरराष्ट्रीय मेजवानी
पुण्यातील एमसीएच्या गहुंजे स्टेडियमवर तब्बल 22 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे. याआधी या मैदानावर मार्च 2021 मध्ये हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली होती. पुण्यातील या स्टेडियमवर चौथा टी-20 सामना रंगणार असून हा एकूण 13 वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. येथे आतापर्यंत 2 कसोटी, 7 एकदिवसीय व 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झालेले आहेत.