वर्ल्ड कपची रंगीत तालीम आजपासून, पहिल्या वन डेसाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा

2

सामना ऑनलाईन । गुवाहाटी

हिंदुस्थानची वन डे वर्ल्ड कपची रंगीत तालीम आजपासून सुरू होईल. हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये उद्या, रविवारी गुवाहाटीमध्ये एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होईल. यात यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतची फलंदाज म्हणून संघात वर्णी लागली असून नव्या दमाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदला बारा खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये होणारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपलीय, मात्र अद्याप ‘टीम इंडिया’ची मधल्या फळीची भट्टी जमलेली नाही. विश्रांती घेऊन परतलेल्या कर्णधार विराट कोहलीला आतापासूनच ही भट्टी जमविण्यासाठी योजना तयार करावी लागणार आहे.

अनुभवी धोनीला इशारा
अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी गेल्या दोन वर्षांपासून फलंदाजीमध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. संघनिवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी विश्वचषक स्पर्धेपर्यंत धोनी यष्टिरक्षक म्हणून राहणार असे सांगितले असले, तरी रिषभ पंतच्या समावेशाने या माजी कर्णधाराला एक प्रकारे इशाराच देण्यात आला आहे. आशिया चषक स्पर्धेत धोनी फ्लॉप ठरला. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेपूर्वी या अनुभवी खेळाडूला आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करावी लागणार आहे.

चौथ्या स्थानावर रायडू खेळणार
विंडीजविरुद्ध शिखर धवन व रोहित शर्मा ही सलामीची जोडी कायम असेल. विराट कोहली तिसऱया क्रमांकावर फलंदाजीला येईल. त्यामुळे अंबाती रायडूला चौथ्या स्थानावर फलंदाजीची संधी मिळणार आहे. आशिया चषक स्पर्धेत त्याने सहा डावांत 175 धावा केल्या होत्या. सातत्यपूर्ण कामगिरी करून विश्वचषक संघातील स्थान पक्के करण्याची रायडूला संधी असेल.

जाडेजावर अष्टपैलू कामगिरीची जबाबदारी
केदार जाधक आणि हार्दिक पांडय़ा यांना दुखापतीमुळे संघाबाहेर ठेकण्यात आले आहे. हे दोघेही अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या गैरहजेरीत फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजावर अष्टपैलू कामगिरीची जबाबदारी असेल. त्याने एका वर्षानंतर आशिया चषक स्पर्धेतून ‘टीम इंडिया’त धडाकेबाज पदार्पण केले. विंडीजविरुद्ध कारकीर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावून त्याने आपण संपलेलो नाही हे दाखवून दिले आहे. भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांच्या गैरहजेरीत मोहम्मद शमी व उमेश यादव वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांच्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल. आशियाई चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज खलील अहमद संधीचे सोने करण्यासाठी टपून बसलेला असेल.

आज हिंदुस्थान-विंडीज पहिली वन डे, विंडीजपुढे अनेक आव्हाने
एकदिवसीय मालिकेतही हिंदुस्थानचा संघ विंडीजपेक्षा कितीतरी सरस वाटतो. विंडीजला ख्रिस गेल व आंद्रे रसेल यांची उणीव भासेल. त्यातच इविन लुईसने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याने विंडीज संघाला धक्का बसला आहे. प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांच्यावर दोन सामन्यांचे निलंबन असल्याने त्यांचीही उणीव विंडीजला भासेल. अशा प्रतिकूल आणि बिकट परिस्थितीत मर्लोन सॅम्युएल्स, अष्टपैलू कर्णधार जेसन होल्डर व वेगवान गोलंदाज केमार रोच या अनुभवी खेळाडूंचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे.

पंतचे वन डे पदार्पण होणार?
मधल्या फळीतील नवीन प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर रिषभ पंतला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने संघनिवड समितीला प्रभावित केले. पंतने ओव्हलमध्ये इंग्लंडविरुद्ध शतक ठोकल्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्धही 92 धावांच्या दोन खेळय़ा करून स्वतःची क्षमता सिद्ध केली. दिल्लीच्या या खेळाडूला दिनेश कार्तिकच्या जागेवर वन डे संघात घेण्यात आले आहे.

summary- india vs west indies odi series will start today