कोणाला मिळणार संधी? विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी आज निवड


सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानची सीनियर राष्ट्रीय निवड समिती उद्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करणार असून यावेळी कोणत्या खेळाडूंना संघात संधी देण्यात येते हे पाहणे रंजक ठरणार आहे. यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीचा सुमार फलंदाजी फॉर्म यावेळी चर्चेचा विषय ठरू शकतो. इंग्लंडमधील अखेरच्या कसोटीत आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दमदार फलंदाजी करणाऱ्या रिषभ पंतला वन डेतही चान्स देण्यात येण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने मधल्या फळीवरही यावेळी गांभीर्याने लक्ष देण्यात येईल.

> रोहित शर्मा, शिखर धवन या सलामीवीरांनी आशिया कपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे या दोघांचे स्थान निश्चित आहे. अंबाती रायुडूनेही आपला ठसा उमटवलाय. त्यामुळे त्याच्या सहभागाबाबत प्रश्नच उद्भवत नाही. पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल या युवा खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडे होताहेत का, हेही पाहणे यावेळी महत्त्वाचे ठरणार आहे.

> गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार या प्रमुख वेगवान गोलंदाजांचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. तसेच अक्षर पटेल याच्याऐवजी रवींद्र जाडेजाची निवड होईल हेही जवळपास निश्चित आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेला केदार जाधवही अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात कमबॅक करील. कुलदीप यादव, युजवेंद्र चाहल यांचे संघातील स्थान कायम असेल.