तेल पेटलं, ओपेक देशांना हिंदुस्थानचा इशारा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीवरून हिंदुस्थानने तेल उत्पादक देशांना इशारा दिला आहे. तेलाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवा अन्यथा मागणीमध्ये घट होईल असा इशारा हिंदुस्थानने ओपेक देशांना दिला आहे. ओपेक (Organization of the Petroleum Exporting Countries) ही तेलनिर्मिती करणाऱ्या देशांचे संघटन आहे. अल्जीरिया, अँगोला, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती व व्हेनेझुएला हे देश ओपेकचे सदस्य आहेत.

ब्लुमबर्गने दिलेल्या रिपोर्टनुसार, जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे आयात करणाऱ्या देशांपैकी एक हिंदुस्थानने ओपेक देशांना तेलांच्या किंमती कमी करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा मागणीमध्ये घट होईल आणि दुसरा पर्याय शोधला जाईल असेही ठासून सांगितले आहे. या संदर्भात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे चेअरमन संजीव सिंह म्हणाले की, गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. तेलाच्या किंमतीत अशाच प्रकारची वाढ होत राहिली तर हिंदुस्थानला दुसऱ्या पुरवठादारांचा पर्याय शोधावा लागेल.

इराणची धमकी
दरम्यान, राजकीय आणि समुद्री सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चाबहार बंदराच्या विस्तार प्रक्रियेमध्ये हिंदुस्थानने आखडता हात घेतल्याने इराणने चेतावणीचा सूर आळवला आहे. चाबहार बंदराच्या विस्तार कामामध्ये कमी गुंतवणूक केली आणि तेल आयातीमध्ये कपात केली तर हिंदुस्थानचा विशेष देशाच्या दर्जा रद्द करण्यात येईल, अशी धमकी इराणने दिली आहे. इराणचे उप-राजदूत मसूद रेजवानियन राहागी यांनी ही धमकी दिली आहे.