रोहितच्या “हिट”ने इंग्लंड गारद : टीम इंडियाने तिसऱ्या टी -२० सह मालिका जिंकली

सामना ऑनलाईन | ब्रिस्टॉल

मुंबईकर रोहित शर्माची धडाकेबाज शतकी “हिट”  रविवारी इंग्लंड संघाला मोठ्या पराभवाच्या खाईत लोटण्यास कारणीभूत ठरली.  सूर गवसलेल्या रोहितने ५६ चेंडूंत १०० धावांची शतकी खेळी करीत हिंदुस्थानला या टी -२० लढतीसह ३ सामन्यांची मालिकाही जिंकून दिली. त्याच्या तुफानी खेळीमुळे यजमान इंग्लंडने टीम इंडियापुढे ठेवलेले १९९ धावांचे मोठे आव्हानही खुजे ठरले. हिंदुस्थानने १८.४ षटकांत ३ बाद २०१ अशी विजयी मजल मारत हि लढत ७ विकेट आणि ८ चेंडू राखून सहज जिंकली.रोहितच्या शतकी खेळीत ११ चौकार आणि ५ टोलेजंग षटकारांचा समावेश होता.हिंदुस्थानने या टी -२० मालिकेत इंग्लंडला २-१ असे पराभूत केलेआहे.

नाणेफेक जिंकून हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीने यजमानांना प्रथम फलंदाजीस पाचारण केले.सलामीवीर जेसन रॉय (३१ चेंडूत ३७) आणि जोस बटलर(२१ चेंडूंत ३४) यांनी धडाकेबाज खेळ करीत इंग्लंडला ७.५ षटकांत ९४ धावांची मोठी सलामी दिली. पण हि जोडी परतल्यावर अष्टपैलू हार्दिक पांड्याने इंग्लिश फलंदाजांची भंबेरी उडवत ३८ धावांत ४ विकेट्स मिळवल्या. यजमानांचा डाव सावरला तो अॅलेक्स हेल्स (३०) आणि जॉनी बेयरस्टो (२५) यांनी .अखेर इंग्लंडने २० षटकांत ९ बाद १९८ अशी मजल मारत टीम इंडियापुढे विजयासाठी १९९ धावांचे आव्हान ठेवले.नवोदित सिद्धार्थ कौलने आपला संघातील समावेश सार्थ ठरवीत ३५ धावांच्या मोबदल्यात २ विकेट्स मिळवल्या.

रोहितच्या धडाक्यापुढे इंग्लिश आर्मी गारद

ब्रिस्टॉलच्या मैदानात रोहित शर्माची बॅट अशी तळपली की इंग्लंडचे वेगवान आणि फिरकी गोलंदाज त्याच्यापुढे पार निष्प्रभ ठरले. रोहितने टी -२० क्रिकेटमधले आपले तिसरे विक्रमी शतक झळकावत संघाची नैय्या विजयापार नेली. टी -२० त सर्वाधिक ३ शतके झळकावण्याचा विक्रम यापूर्वी न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोच्या नावावर होता. रोहितने त्याची बरोबरी साधली. रोहितला उत्तम साथ करीत कर्णधार विराट कोहली(२९ चेंडूंत ४३) आणि हार्दिक पांड्या (१४ चेंडूंत नाबाद ३३) यांनी हिंदुस्थानच्या शानदार विजयला मोठा हातभार लावला.

धोनीचा नवा विक्रम

यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडविरुद्धच्या ब्रिस्टॉल टी-२० लढतीत यष्ट्यांमागे ५ झेल टिपत नव्या विक्रमाची नोंद केली. टी -२० क्रिकेटमध्ये यष्ट्यांमागे आता धोनीच्या नावावर सर्वाधिक म्हणजे ५४ झेलांची नोंद झाली आहे. या क्रिकेट प्रकारात धोनीनंतर ३४ झेल घेणारा वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक दिनेश रामदिन दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक ३० झेलांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ९३ व्या टी -२० लढतीत झेलांची पन्नाशी ओलांडण्याचा पराक्रम धोनीने केला आहे.