२०१२ चा बदला, इंग्लंडला ४-० ने दिली मात

सामना ऑनलाईन । चेन्नई

इंग्लंडच्या २०१२ मधील दौऱ्यात हिंदुस्थानी संघाच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढत कर्णधार विराट कोहलीच्या संघाने चेन्नई कसोटीसह ४-० असा मालिका विजय मिळवला. इंग्लंड विरोधात हिंदुस्थानचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. अर्थात करुण नायर आणि रवींद्र जाडेजा यांची खेळी महत्वाची ठरली.

इंग्लंडची पहिल्या डावातील ४७७ अशी धावसंख्या आणि त्यानंतर हिंदुस्थानची संयमी खेळी बघता हा सामना अनिर्णित राहणार ही भावना क्रिकेटप्रेमींमध्ये होती. मात्र आधी लोकेश राहुल याच्या १९९ धावा, त्यानंतर करुण नायरनं वादळी खेळी करत ठोकलेलं त्रिशतक यामुळे हिंदुस्थानला मोठी धावसंख्या उभारता आली. शेवटच्या दिवशी हिंदुस्थानच्या विजयाची जबाबदारी गोलंदाजांवर होती. त्यामध्ये रवींद्र जाडेजाने कमाल करत ७ बळी घेतले. तर इशांत शर्मा, उमेश यादव, अमित मिश्राला प्रत्येकी एक बळी मिळाला. त्यामुळे हिंदुस्थानचं इंग्लंडवर विजयाचं स्वप्न पूर्ण झालं.

दरम्यान, यावेळी करुण नायर याला सामनावीर तर विराट कोहली याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं.