हिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका

1
फोटो - बीसीसीआय

सामना ऑनलाईन,मेलबर्न

युजवेंद्र चहलची प्रभावी फिरकी गोलंदाजी आणि महेंद्रसिंह धोनी व केदार जाधव यांनी केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने शुक्रवारी झालेल्या अखेरच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला 7 गडी व 4 चेंडू राखून धूळ चारली आणि वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. टीम इंडियाने पहिल्यांदाच कांगारूंच्या देशात द्विपक्षीय मालिका जिंकत इतिहास रचला. तसेच मेलबर्नमध्ये तब्बल 11 वर्षांनंतर सामना जिंकण्याची करामतही यावेळी करण्यात आली. वन डे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या युजवेंद्र चहलची ‘सामनावीर’ म्हणून तर सलग तीन अर्धशतके झळकावणाऱ्या महेंद्रसिंह धोनीची ‘मालिकावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

Photo : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज

धावांचा पाठलाग करणाऱ्या हिंदुस्थानची अवस्था 3 बाद 113 धावा अशी झाली होती. याप्रसंगी महेंद्रसिंह धोनी व केदार जाधव या जोडीने कांगारूंच्या गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला केला. दोघांनी 121 धावांची भागीदारी रचत टीम इंडियाचा विजय सुकर केला. महेंद्रसिंह धोनीने 114 चेंडूंत 6 चौकारांसह नाबाद 87 धावांची खेळी साकारली. मराठमोळय़ा केदार जाधवने 57 चेंडूंत 7 चौकारांसह नाबाद 61 धावा फटकावल्या.

दरम्यान, याआधी लेगस्पिनर युजवेंद्र चहल याने आपल्या कारकिर्दीतीलच नव्हे तर ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम गोलंदाजी करताना आपला ठसा उमटवला. त्याने 42 धावा देत कांगारूंच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याआधी हिंदुस्थानच्याच अजित आगरकरने 2004 साली मेलबर्नमध्येच 42 धावा देत 6 फलंदाज बाद केले होते. ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम या दोघांच्या नावावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून पीटर हॅण्डस्कोम्बने सर्वाधिक 58 धावा तडकावल्या.

आयोजक तुपाशी, विजेते उपाशी,गावसकरांची क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीका

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी केली. सुरुवातीला तब्बल 71 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच वन डे मालिका जिंकली. यावेळी मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून विजेत्यांना बक्षिसाची रक्कम देण्यात आली नाही. यावर हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियावर कडाडून टीका केली. खेळाडूंमुळेच आयोजकांनी टीव्हीवरील प्रक्षेपणातून बक्कळ कमाई केली. त्यामुळे विजेत्या संघातील खेळाडूंना त्यांनी केलेल्या कामगिरीचे फळ मिळायला हवे. हे पैसे त्यांच्या हक्काचे असणार आहेत, असेही गावसकर पुढे म्हणाले.