मध्यरात्री हवाई दलाने केले शक्तीप्रदर्शन, पाकिस्तानची टरकली

सामना ऑनलाईन । मुंबई

बुधवारी पूँछ जिल्ह्यातील सीमारेषेजवळ पाकिस्तानची लढाऊ विमाने दिसल्यानंतर गुरुवारी हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानला त्यांची ताकद दाखवली. अमृतसर व जम्मू जिल्ह्यातील सीमा रेषेजवळ हिंदुस्थानी हवाई दलाच्या विमानांनी मध्यरात्री सराव केला. या अभ्यासाच्या वेळी हवाई दलातील लढाऊ विमाने सहभागी झाली होती त्यामुळे सीमेवर मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा आवाज येत होता. हवाई दलाच्या या शक्तीप्रदर्शनामुळे पाकिस्तानची झोप उडाली होती.

पंजाबमधील अमृतसर व जम्मू कश्मीरमधील जम्मू शहरातील हवाई दलाच्या तळांवरील सर्व विमाने या सरावात सहभागी झाली होती. हवाई दलाने विमाने सीमा रेषेपर्यंत नेली होती. हिंदुस्थानच्या या शक्तीप्रदर्शनामुळे पाकिस्तानची टरकली असून त्यांनी या अभ्य़ासानंतर हाय अलर्ट जारी केला.

या सरावादरम्यान झालेल्या जोरदार धमाक्यांच्या आवाजामुळे आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र नंतर हवाई दलाच्या सरावाचा हा आवाज असल्याचे समजल्यानंतर लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.