हिंदुस्थानी राजदूत करणार परदेशात व्यापाराचा प्रचार

मधुकर ठाकूर । उरण

हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हिंदुस्थानाच्या निर्यात व्यापाराची जगातील अन्य देशांशी व्यापारात वृद्धी होणे महत्वाचे झाले आहे. परकीय कंपन्यांना त्यांची उत्पादन निर्मिती हिंदुस्थानात करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आंतररार्ष्ट्रीय व्यापारात हिंदुस्थानी क्षमतेची ओळख विविध उत्पादन निर्मिती क्षेत्रास करून देणे क्रमप्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर ११ विविध देशातील हिंदुस्थानी राजदूतांनी जेएनपीटी अधिकाऱ्यांबरोबर जेएनपीटीच्या विविध विकासकामाविषयी तसेच व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या शक्यतांवर नुकतीच मुंबईत चर्चा केली.

सौदी अरेबिया, रशिया,कोलंबिया, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, बेलारूस, डेन्मार्क, ट्युनिशिया, फिजी, कोरिया आणि तुर्कमेनिस्तान इत्यादी देशातील हिंदुस्थानी राजदूत व्यापार क्षेत्रास चालना मिळावी यासाठी बैठकीस उपस्थित होते.

जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी ११ हिंदुस्थानी राजदूतांना जेएनपीटीच्या एकंदरीत कामकाजाविषयी माहिती दिली तसेच मागील काही वर्षांपासून इझ ऑफ डुईंग बिजनेस व सागरमाला उपक्रमास सहकार्य करण्यासाठी चालू असलेल्या विविध उपाय योजनांवर प्रकाश टाकला. जगातील प्रमुख बंदरामध्ये जेएनपीटी ३३ व्या क्रमांकावर असून देशातील हे सर्वात मोठे पोर्ट आहे. मार्च २०१८ पर्यंत जेएनपीटी ने सर्वाधिक ४.८३ मिलियन टीईयूची हाताळणी केली आहे तसेच २०२२ पर्यंत चौथ्या टर्मिनलचे काम पूर्ण होताच पोर्टची क्षमता १० मिलियन टीईयू पर्यंत वाढणार आहे. बन्सल यांनी पोर्ट मधून निघालेला कार्गो ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत वेळ आणि पैसा दोहोंची बचत
होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

जेएनपीटी डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी ) आणि डीपीई (डायरेक्ट पोर्ट एन्ट्री ) ला प्रोत्साहन देत आहे. ज्यामुळे आयात निर्यात व्यापारात होणारा वाहतूकीचा प्रश्न सुटण्यास मदत होत असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. जागतिक मापदंडानुसार अन्य देशाच्या तुलनेत हिंदुस्थानातील वाहतूक खर्च जास्त असून हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि जगाशी बरोबरी करण्यासाठी वाहतूक दर कमी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

बन्सल यांनी हिंदुस्थानी राजदूतांना विकसित करीत असलेल्या चार ड्राय पोर्टविषयी तसेच जेएनपीटीच्या २७७ हेक्टर वर उहिंदुस्थान असलेल्या सेझ विषयी माहिती दिली. ड्राय पोर्टमुळे हिंटरलँडशी कनेक्ट होऊन कार्गो थेट पोर्ट मध्ये येण्यास मदत होणार असून सेझ परकीय गुंतवणूकदारास आकर्षित करून हिंदुस्थानास उत्पादन क्षेत्राचे महत्वाचे केंद्र होण्यास मदत करणार आहे. त्याच बरोबर अनेक मोठ्या कंपन्यांनी सेझ मध्ये उत्पादन निर्मिती प्रकल्प उभारण्यात रस दाखवला असून ज्यामुळे १.२५ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती स्थानिकांसाठी होणार असल्याचे बन्सल पुढे म्हणाले.

बन्सल यांनी आयात निर्यात व्यापाराला सुलभरीत्या कार्गो हाताळणी करता यावी तसेच सर्वोत्कृष्ट सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी होऊ घातलेल्या पायाभूत सुविधांविषयी माहिती दिली. जेएनपीटीच्या कामकाजातील प्रगतीविषयी तसेच व्यापाराला चालना मिळावी यासाठी होऊ घातलेल्या जागतिक सुविधांविषयी उपस्थित राजदूतांनी आनंद व्यक्त केला.