हिंदुस्थानच्या जवानांनी पुन्हा केला ‘सर्जिकल स्ट्राईक’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करत सीमेजवळ असणारे अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. हिंदुस्थानी लष्कराने म्यानमारच्या सीमेजवळ ही कारवाई केली आहे. लष्कराने नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड खापलांगचे (एनएससीएन-के) दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.

लांग्खू गाव येथे असलेल्या नागा दहशतवाद्यांच्या तळावर लष्कराच्या तुकडीने सर्जिकल स्ट्राईक केला. या कारवाईत दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंदुस्थानी लष्कराचा एकही जवान जखमी झालेला नाही असे ‘ईस्टर्न कमांड’ने सांगितले. लष्कराने ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा शब्द वापरलेला नाही. मात्र दहशतवादी तळावर कारवाई केल्याचे सांगितले. या कारवाईत एनएससीएन खापलांगचे अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराने दिली.

याआधी जून २०१५मध्ये हिंदुस्थानी लष्कराने म्यानमारमध्ये घुसून १५ दहशतवाद्यांना ठार मारले होते. नागा दहशतवाद्यांनी मणिपूरमधील चंदेल येथे हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल ही कारवाई करण्यात आली होती.