कश्मीर: दहशतवाद्यांशी लढण्यासाठी जवानांना मिळणार रोबो

फाईल फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या शोध मोहिमेला आणखी बळ मिळणार आहे. हिंदुस्थानच्या जवानांना एक असे यंत्र मिळणार आहे ज्याच्या जोरावर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या मोहिमेला आणखी धार येणार आहे. जवानांना मिळणाऱ्या रोबोचा वापर अतिशय दुर्गम भागात आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये होणार आहे. लष्कराला शस्त्रे आणि दारुगोळा पोहोचवण्याची कामगिरी रोबो पार पाडणार आहे.

जम्मू-कश्मीरमधील अतिशय दुर्गम भागात शोध मोहीम राबवताना जवानांना अनेक अडचणी येतात. दहशतवाद्यांकडून होणाऱ्या गोळीबाळादरम्यान जवानांच्या जीवालाही धोका असतो. अशावेळी जवानांना रोबोची मदत होणार आहे. या रोबोची निर्मिती स्वदेशी तंत्रज्ञान वापरून करण्यात येणार आहे. लष्कराने अशा ५४४ रोबोची मागणी केली होती. संरक्षण मंत्रालयाकडून लष्कराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

रोबोचा सर्वाधिक फायदा दहशतवाद्यांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय रायफलच्या जवानांना होणार आहे. दहशतवाद्यांकडून होणाऱ्या गोळीबारात जवानांना होणाऱ्या दुखापतींमध्ये रोबोचा वापर केल्यामुळे कमतरता येईल.

जम्मू-कश्मीरमध्ये जुलैपर्यंत १००पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवादी अबू दुजानाचा खात्मा हे दहशतवादविरोधी मोहिमेचे मोठे यश आहे.