अबूधाबीत एका सेकंदात हिंदुस्थानी बनला करोडपती

सामना ऑनलाईन । अबुधाबी

वर्षानुवर्षे जीवतोड मेहनत करूनही करोडपती बनण्याचे अनेकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत नाही. हिंदुस्थानी वंशाचे थैंसिलस याला अपवाद ठरले आहेत. अबूधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिग तिकीट लॉटरीचे तिकीट काढलेल्या थैंसिलस यांनी तब्बल १२ कोटी रूपये जिंकले आहेत. विशेष म्हणजे थैंसिलस यांच्यासमवेत आणखी १७ हिंदुस्थानी नागरिक ही लॉटरी जिंकले असून त्यांनी लाखो रूपयांची कमाई केली आहे. थैंसिलस यांनी ०३०२०२ या क्रमांकाचे बिग तिकीट जिंकले होते. नुकतीच या बंपर बक्षिसाची घोषणा झाली. याआधी जानेवारीमध्ये झालेल्या बंपर लॉटरीमध्ये हरिकृष्ण यांना २०.८ कोटी रूपयांची लॉटरी लागली होती. थैंसिलस यांनी ही लॉटरी काढण्याची आताची आठवी वेळ होती. कधीतरी आपण बक्षिस जिंकू, असा त्यांना विश्वास होता. अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.