नथीचा नखरा

>>पुजा तावरे<<

सगळा साज शृंगार पूर्ण झाला तरी ज्याच्याशिवाय चेहऱ्याला रूप येत नाही असा दागिना म्हणजे नाकातील चमकी, नथ हे आभूषण. नासिकाभूषण हे सौभाग्यालंकार मानले गेल्याने प्रत्येक प्रांतात आणि परंपरामध्ये तिला केगळे स्थान आहे.

पूर्वी पाणीदार मोत्यांची आणि काहीशी मोठय़ा आकाराची नथ अनेक स्त्रिया हौसेनं, आवडीनं घालत असत. नऊवारी साडीवर नथ पाहिजेच पाहिजे असंच समीकरण होतं. आता नथ स्टाइल जुनी झाली असं वाटत होतं. पण बाजारात प्रौढ स्त्रियांपासून अगदी तरुणींनाही भुरळ घालतील, मोहात पाडतील अशा अनेक नथी आल्या आहेत. हिऱ्याच्या, खडय़ांच्या, मोत्याच्या, चापच्या आणि अन्य अनेक प्रकारच्या नथी उपलब्ध आहेत. त्यातही ‘जय मल्हार’फेम बाणाईच्या नाकातली अर्धचंद्राकृती आकाराची नथ तुफान लोकप्रिय झाली आहे. बाणाईची नथ बघता बघता फॅशनच्या जगात हिट झाली. या नथीत हिरव्या आणि राणी रंगाचे खडे, अमेरिकन डायमंड असतात.

‘बाजीराव मस्तानी’मध्ये प्रियंका दीपिकाने ‘पिंगा’ गाण्यासाठी घातलेली नथ, ‘कमिने’ चित्रपटातील प्रियंकाने केलेली पारंपरिक मराठी केशभूषा, ‘रा-वन’मधील करिनाचा ‘छम्मक छल्लो’ डान्स, ‘मला जाऊ दे’ गाण्याकर विद्या बालनचे ठुमके, ‘जोकर’ सिनेमात चित्रांगदाचे आयटम साँग अन् सोनाक्षीने ‘गो गो गोविंदा’ म्हणत फोडलेली हंडी… या सर्वांमध्ये असणारी कॉमन गोष्ट म्हणजे नाकातील नथ. सध्या हीच मराठमोळी नथ आगळीवेगळी स्टाइल स्टेटमेंट म्हणून होत आहे. मध्यंतरी नाक टोचणं हे खूप जुनाट समजलं जायचं. पण हल्ली मात्र सर्रास मुली नाक टोचताना दिसत आहेत. नोज रिंगनंतर सध्या नथ आणि चमकीची फॅशन पुन्हा येऊ घातली आहे.

नथ पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये अतिशय नावाजलेला असा हा दागिना. नऊवारी साडी असेल तर नथ हवीच. नथीमध्ये पुर्वीपासूनच्या पारंपरिक डिझाइन्स रूढ आहेत. यात मराठा पद्धतीची नथ थोडी मोठी, तर ब्राह्मणी पध्दतीची नथ नाजूक असते. मराठा नथ ब्राह्मणी नथीपेक्षा थोडी वेगळी… ही नथ ब्राह्मणी नथीपेक्षा मोठी असते आणि जास्त भरगच्च सुद्धा. कारवारी नथ ही दिसायला अत्यंत आकर्षक दिसते. मोत्यांचं अर्धवर्तुळ आकारातलं कडं आणि त्या कर्तुळाच्या आतून सोन्यांच्या तारांची नाजूक नक्षी असं साधारण या कारवारी नथीचं रुप असतं.

नथीचा ट्रेंड पुन्हा एकदा येण्यामागचं कारण म्हणजे टीव्ही-बॉलीवूडमध्ये असणारं तिचं वास्तव्य. टिपिकल नऊवारी साडी अन् रूबाबदार अशी नथ असा केश तर ‘सुवासिनी’, ‘उंच माझा झोका’, ‘पुढचं पाऊल’, ‘देवयानी’ या मराठी मालिकांमध्येही दिसून येत आहे. याबरोबरच चमकीचा ट्रेंडही पुन्हा येऊ पाहतोय. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या ज्वेलरीच्या मागणीप्रमाणे नथीलाही अधिक मागणी येऊ लागली आहे. यामध्ये पारंपरिक अशा मोत्याच्या, खडय़ांच्या, चापाची नथ, प्रेस अशा नथींना अधिक मागणी दिसून येत आहे.

अशाही काही नथी…

बंगाली स्टाईल : जर तुम्ही बंगाली असाल तर हलक्या क्रॉफ्टवाल्या आणि साखळीने जोडलेली नथ तुम्हाला अधिक आकर्षित दिसेल.

रिंगवाली नथ : जर तुम्हाला अगदी साधी नथ घालायची असेल तर तुम्ही रिंगवाली नथ वापरू शकता.

जडावू नथ : विशेषत: राजस्थानी व मारवाडी विवाहित स्त्रियामध्ये ही नथ वापरण्याची परंपरा आहे. जडावू नथ लग्नसमारंभात खूप उठून दिसते आणि ती तुम्ही जडावू लेहंग्यासोबत घालू शकता.

मल्टिपल चेनवाली नथ : ही नथ खास करून साऊथ इंडियन लोकांमध्ये जास्त वापरली जाते. पण जर तुम्ही ज्वेलरी डिझाईनसोबत घालायची असेन तर तीन साखळ्या असलेली नथ वापरल्यास तुमचा लूक अधिक आकर्षक दिसेन. यासोबत हेवी मांगटिका खूप उठून दिसतो.

हुप नथ : खूप मोठय़ा आकाराच्या नथ वापरण्याऐवजी तुम्ही छोटीशी नोज रिंग वापरू शकता. ही कुठेही नेता येणेही सोपे जाते. दृष्टी धामी हिने ही नथ लग्नात वापरली होती.