बॅटवरच्या स्टिकरसाठी विराट घेतो १०० कोटी

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थान क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची बॅट सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. विराट आपल्या बॅटच्या मदतीने धावा करत अनेक विक्रम प्रस्थापित करत आहे. त्याचबरोबर विराटची बॅट त्याला बक्कळ कमाईही करून देत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण विराट त्याच्या बॅटच्या साहाय्याने करोडो रुपये कमवत आहे.

अनेक खेळाडू एखाद्या मोठ्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी मोठी रक्कम घेतात. क्रिकेटपटूदेखील त्यांच्या खेळासोबतच एखाद्या मोठ्या ब्रँडचं प्रमोशन करून पैसे कमावताना दिसतात. हिंदुस्थानी क्रिकेट संघात जाहिरातींच्या माध्यमातून सध्या कर्णधार विराट कोहली सर्वाधिक कमाई करत आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्याला वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या जाहिराती मिळत असतात. जाहिरातींसोबतच क्रिकेटरच्या बॅटवर स्टिकर लावायचा असेल तरी क्रिकेटपटूंना खूप पैसे द्यावे लागतात. बॅटवर स्टिकर लावण्यासाठी क्रिकेटर आणि कंपनी यांच्यामध्ये करार होतात.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बॅटवरही एमआरएफचं स्टिकर होतं. तेच एमआरएफचं स्टिकर आता विराट कोहलीच्या बॅटवरही दिसत आहे. विराट एमआरएफचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. एमआरएफने आठ वर्षांसाठी विराटसोबत १०० कोटींचा करार केला आहे. फक्त विराटच नाही तर महेंद्र सिंह धोनी, रोहित शर्मा आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलही जाहिरातीसाठी मोठी रक्कम घेतात. धोनीच्या बॅटवर ऑस्ट्रेलियाच्या स्पार्टन स्पोर्ट्सचा स्टिकर आहे. स्टिकरद्वारे या बॅटवर जाहिरात करण्यासाठी धोनीला दरवर्षी कंपनी ६ कोटी रुपये देते. तर ख्रिस गेलला स्पार्टन स्पोर्ट्सकडून दरवर्षी ३ कोटी मिळतात. हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्माला जाहिरातीसाठी प्रसिद्ध टायर कंपनी सीएट दरवर्षी ३ कोटी रुपये देते.