हिंदुस्थानचे कसोटीपटू कौंटी खेळणार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी करणार सराव

3

सामना प्रतिनिधी, मुंबई

हिंदुस्थानच्या वन डे संघात निवड न झालेले आणि कसोटी स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे क्रिकेटपटू मे ते जुलै या कालावधीत इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहेत. यामध्ये अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ या मुंबईकरांसह चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, हनुमा विहारी या फलंदाजांचा समावेश आहे. तसेच इशांत शर्मा व रविचंद्रन अश्विन हे गोलंदाजही इंग्लंडमधील स्पर्धेत खेळून चांगला सराव करवून घेणार आहेत. वर्ल्ड कप झाल्यानंतर कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडिजला भिडण्याआधी हे ‘सात’ खेळाडू कौंटी खेळून परिपक्व होतील. चेतेश्वर पुजारा आणि यॉर्कशायर कौंटी यांच्यामध्ये तीन वर्षांचा करार करण्यात आलाय. त्यामुळे त्याचा मार्ग मोकळा आहे.

सराव मिळणे महत्त्वाचा आहे
बीसीसीआय व प्रशासकीय समितीने हिंदुस्थानातील ‘कसोटी’ स्पेशालिस्टसाठी स्पेशल योजना आखली आहे. त्यानुसार जून, जुलै या कालावधीत त्यांना इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट खेळता येणार आहे. तेथील अव्वल संघासोबत गेल्या वर्षीच बोलणी झाली असून सात कसोटी खेळाडूंना दरवर्षी तेथे खेळता येणार आहे. वेस्ट इंडिज दौऱयाआधी डिव्हिजन एक किंवा दोनमध्ये त्यांना खेळायला मिळायला हवे. जेणेकरून त्यांना कसून सराव करता येईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.