हिंदुस्थानात २ लाख ४५ हजार करोडपती

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

हिंदुस्थानात श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हिंदुस्थानची एकूण संपत्ती ३ लाख २६ हजार ९८७ अब्ज एवढी झाली आहे. हिंदुस्थानात २ लाख ४५ हजार करोडपती आहेत आणि २०२२ पर्यंत अतिश्रीमंतांची देशातील लोकसंख्या ३ लाख ७२ हजार होऊन देशाची एकूण संपत्ती ४ लाख ६४ हजार ३२२ अब्ज एवढी होईल, असे अनुमान ‘क्रेडिट स्विस ग्लोबल वेल्थ’ च्या अहवालात काढण्यात आले आहे.

‘क्रेडिट स्विस ग्लोबल वेल्थ’ च्या अहवालानुसार २००० सालापासून हिंदुस्थानची संपत्ती दरवर्षी ९.९ टक्क्यांनी वाढत आहे. जागतिक तुलनेत संपत्ती वाढीचा हा दर ६ टक्क्यांनी जास्त आहे. हिंदुस्थानी श्रीमंतांच्या संपत्तीत ४५१ अब्ज डॉलर्स इतकी वाढ झाली असून सर्वाधिक संपत्ती कमावणाऱ्या देशांमध्ये हिंदुस्थानचा ८ वा क्रमांक लागतो. जगातील एक टक्का श्रीमंतांच्या यादीत हिंदुस्थानातील ३ लाख ४० हजार श्रीमंतांचा समावेश आहे. १ हजार ८२० हिंदुस्थानींकडे ५ करोड डॉलर्सपेक्षाही जास्त संपत्ती आहे तर ७६० जणांकडे १० करोड डॉलर्सपेक्षाही जास्त संपत्ती आहे.

अहवालानुसार श्रीमंतांप्रमाणे हिंदुस्थानात गरीबांची संख्याही तितकीच जास्त आहे. ९२ टक्के लोकांकडे ६ लाख ५३ हजार ९७५पेक्षाही कमी संपत्ती आहे.