तिरंगी मालिकेसाठी रोहितवर कर्णधारपदाची धुरा, ‘या’ खेळाडूंना विश्रांती

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दक्षिण आफ्रिकेच्या दीर्घ दौऱ्यानंतर हिंदुस्थानचा संघ बांग्लादेश आणि श्रीलंकेसोबत होणाऱ्या तिंरगी मालिकेमध्ये सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला जाणार आहे. पुढील महिन्यात ६ मार्चपासून या मालिकेची सुरुवात होईल. या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा करण्यात आली असून मुंबईकर रोहित शर्मावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

आफ्रिकेच्या दीर्घ दौऱ्यानंतर संघ व्यवस्थापनाने संघातील काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहली, यष्टीरक्षक एम.एस. धोनी, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांचा समावेश आहे.

हिंदुस्थान, बांग्लादेश आणि श्रीलंका संघात होणारी तिरंगी मालिका ६ मार्च ते १८ मार्च या दरम्यान खेळली जाणार आहे. मालिकेमध्ये फायनलसह एकून ७ सामने खेळले जातील. श्रीलंकेमध्ये होणाऱ्या या तिरंगी मालिकेचे प्रक्षेपण हिंदुस्थानी वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता होईल.

रोहितवर डाव –
विराट कोहलीच्या अनुस्थितीत मुंबईकर रोहितवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात रोहितने कर्णधारपदाची धुरा सांभाळत हिंदुस्थानला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. रोहितने आतापर्यंत कर्णधारपदी असताना श्रीलंकेविरुद्ध ३ आणि आफ्रिकेविरुद्ध १ सामना जिंकून देण्याची कामगिरी केली आहे.

युवा खेळाडूंवर मदार –
तिरंगी मालिकेमध्ये रोहितला अनुभवहीन खेळाडूंसह मैदानावर उतरावे लागणार आहे. त्यामुळे या खेळाडूंना मार्गदर्शनासह वैयक्तीक कामगिरीतही सुधारणा करण्याची संधी रोहितकडे असणार आहे. हिंदुस्थानच्या संघामध्ये ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, विजय शंकर और मोहम्मद सिराज या नवख्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी युवा खेळाडूंकडे दमदार कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या युवा खेळाडूंसह मनिष पांडे, सुरेश रैना, शिखर धवन, दिनेश कार्तिक या खेळाडूंवर संघाची मदार असणार आहे.

तिरंगी मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), मनिष पाडे, के.एल. राहुल, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, वाशिंग्टन सुंदर, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकत, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.