बॉम्बची अफवा पसरविणाऱ्या हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन नागरिकाला अटक

सामना ऑनलाईन । मुंबई

विमानात बॉम्ब असल्याचा कॉल करणाऱ्या एका हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. विनोद मूरजानी असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याने मात्र आपण मुंबई ते दिल्ली विमानाचे स्टेटस विचारण्यासाठी कॉल केला होता पण त्यावेळी हेल्पलाईनवरील प्रतिनीधीने बॉ्म्बे च्या ऐवजी बॉम्ब ऐकले असा दावा केला आहे.

अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत कार्यकारी अधिकाऱी असलेले मूरजानी हे काहि दिवसांपूर्वीच हिंदुस्थानात आले होते. रविवारी ते परत अमेरिकेला निघाले होते. पण त्याआधी त्यांना रोमला जायचे होते. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब देखील होते. मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांनी विमानतळाच्या हेल्पलाईनला फोन करून त्यांनी बॉम-देल (मुंबई-दिल्लीचा शॉर्ट कोड) चे स्टेटस विचारले. त्यानंतर स्टेटस समोरून काही उत्तर येण्याआधीच त्यांनी फोन ठेवून दिला. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासोबत विमानात जाऊन बसले.

दरम्यान त्यांनी ज्या हेल्पलाईनवर कॉल केलेला तेथील महिला प्रतिनिधीला बॉम-देल ऐवजी बॉम्ब आहे असे ऐकायला आले. त्यामुळे तिने तत्काळ विमानतळावरील पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस तपासात हा कॉल विमानतळावरीलच फोनबुथवरून आल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी फोनबुथ जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर त्यात मूरजानी हे हेल्पलाईनला कॉल करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी विमानात चढून मूरजानी यांना खाली उतरवले व त्यांना अटक केली.

पोलिसांनी मूरजानीला न्यायालयात हजर केले असता त्याने आपण बॉम्ब म्हटले नसल्याचा दावा केला आहे. मला वाटले विमानाची माहिती मिळविण्यासाठी मुंबई दिल्ली बोलण्याऐवजी बॉम- देल हा विमानाचा शॉर्ट कोड सांगावा. म्हणून मी त्यांच्याकडे बॉम- देलचे स्टेटस मागितले पण त्याचदरम्यान विमानतळावर घोषणा झाल्याने मी फोन ठेवला. हेल्पलाईनवर बॉम- देलचे बॉम्ब ऐकले असावे. असे मूरजानी याने न्यायालयात सांगितले. त्यानंतर मूरजानी यांना न्यायालयाने १५ हजाराच्या जाचमुचलक्यावर जामिन दिला आहे.