रसलिंबू

मीना आंबेरकर

जिभेची गेलेली चव परत आणण्याचे काम लिंबू चोख बजावते

गेल्या भागात आपण कैरीच्या लोणच्यांचे प्रकार पाहिले. परंतु कैरीइतकेच महत्त्वाचे लिंबाचे लोणचेही. तोंडाची चव जाते, जेवण नकोसे होते अशावेळी हमखास लिंबाचे लोणचे जिभेची रुची परत आणण्यासाठी कामी येते. बघूया तर लिंबाच्या लोणच्यांच्या काही खास कृती…

limbu-pickle

साहित्य…१२ लिंबे लोणच्यासाठी ५-६ लिंबे रसासाठी. लिंबाच्या फोडींचे चार भाग करून त्यातील एकापेक्षा थोडा कमी भागाइतके मीठ मिठाचा तिसरा भाग हळद व तिखट बोराएवढा हिंग आणि तितकीच मेथी.

कृती…सर्व मसाला मिठासकट भाजून घ्यावा. आवडत असल्यास थोडी साखर घालावी हा मसाला लिंबांच्या फोडीवर नीट पसरावा व सर्व एकत्र करावे. या फोडींवर लिंबाचा रस पिळावा लोणचे बरणीत भरताना सर्व मसाला फोडीत कुस्करून भरल्यास काही वेळा बराच रस सुटतो हे लोणचे थोडे सैलसर झाले तर लिंबाच्या ऍसिडमुळे फोडी आपोआप वर खाली होतात तरीसुद्धा लिंबाचे लोणचे हे वरचेवर ढवळावे लागते.

bharli-lonchi

भरल्या लिंबाचे लोणचे

साहित्य…२५ रसाळ मध्यम आकाराची लिंबे, मीठ अडीच वाटय़ा, लाल, तिखट वाटी, हिंगपूड चार चमचे, मेथ्या १ चमचा तळून पूड करून हळद १ चमचा.

कृती…लिंबाला दोन चिरा पाडून चार भाग करावेत वरील सर्व मसाला एकत्र करून लिंबात भरावा व स्वच्छ कोरडय़ा बरणीत ही भरलेली लिंबे एकावर एक रचून ठेवावीत व झाकण लावावे. लोणचे मुरेपर्यंत ही लिंबे खालीवर करावीत चार दिवसांत रस सुटतो.

goad-lonchi-2

लिंबाचे गोड लोणचे (उपवासाचे)

साहित्य व कृती…लिंबाचे लोणचे शिजवून करताना आधी लिंबे कुकरमध्ये शिजवून त्याचे बारीक तुकडे करावेत. फोडीच्या चौथ्या भागाइतके मीठ दुसरा भाग साखर किंवा गूळ एखादी लवंग ठेचून घालावी चांगले कुस्करून भरावे. हे लोणचे बरेच दिवस टिकते याला रसही बराच सुटतो.

chilli-pickle

मिरचीचे लोणचे

साहित्य…१-२ हिरव्या मिरच्या, मीठ १ वाटी, २ चमचे मोहरी वाटून, २ चमचे मेथी तळून वाटून, २ चमचे हिंगपूड व हळद अर्धा चमचा.

कृती…सर्व एकत्र करावे. आयत्या वेळी लिंबाचा रस घालून कालवून ठेवावे हाच मसाला वापरून चिंचेचा कोळ, गूळ घालून टिकाऊ मिरची करतात.

oninon-pickle

कांद्याचे लोणचे

साहित्य…दोन वाटय़ा चिरलेला कांदा, एक चमचा तिखट, मीठ, लिंबाएवढा गूळ, पाव वाटी मोहरीची डाळ, हळद, अधी वाटी तेल, फोडणीचे साहित्य.

कृती…कांदे सोलून ते लांब व बारीक चिरावेत मोहरीची डाळ कुटून मीठ घालून चिरलेल्या कांद्यात घालावी. तसेच गूळ बारीक चिरून घालावा आणि तिखट व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र मिसळून सारखे करावेत. त्यावर लिंबू पिळावे. तेलाची फोडणी करून ती गार झाल्यावर कांद्याच्या लोणच्यावर घालून लोणचे ढवळावे आणि बरणीत भरून ठेवावे.