दोन महिन्यांऐवजी पाकिस्तानच्या तुरुंगात भोगली ३६ वर्षांची शिक्षा 

सामना ऑनलाईन । जयपूर

पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या एका हिंदुस्थानी व्यक्तीची तब्बल ३६ वर्षांनी सुटका होणार आहे. राजस्थानच्या जयपूरमधील गजेंद्र शर्मा १९८२ मध्ये बेपत्ता झाले होते. ते पाकिस्तानातील लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात असल्याची माहिती गेल्या वर्षी मे महिन्यात मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केले. त्यामुळे तब्बल ३६ वर्षांनी त्यांची सुटका होणार आहे. मात्र, ते जयपूरहून पाकिस्तानात कसे पोहोचले याची माहिती मिळालेली नाही.

गजेंद्र बेपत्ता झाले त्यावेळी ते ४० वर्षांचे होते. ते पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. मात्र, अचानक ते बेपत्ता झाले. ते कोठे गेले कसे गेले याची काहीच माहिती मिळाली नाही. कुटुंबीयांनी त्यांचा खूप शोध घेतला, पण त्यांची काहीच माहिती मिळाली नाही. मात्र, गेल्या वर्षी मे महिन्यात ते लाहोरमधील तुरुंगात असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले. १३ ऑगस्टला ते पाकिस्तानी तुरुंगातून सुटणार आहेत. ते बेपत्ता झाले तेव्हा पत्नी आणि दोन मुलांचे कुटुंब मागे होते. आता ते पत्नी मुलांसह सहा नातवडांनाही भेटणार आहेत. आता ते ७६ वर्षाचे आहेत.

गजेंद्र यांच्या सुटकेच्या वृत्तामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यांची पत्नी मखनीदेवी आणि त्यांचा लहान मुलगा मुकेश यांनी गुरुवारी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांची गुरुवारी भेट घेतली. सिंग यांनी गजेंद्र यांच्या सुटकेची बातमी त्यांना सांगितली. स्वांतत्र्य दिनापूर्वी गजेंद्र देशात परतत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयारी करत असल्याचे मुकेश यांनी सिंग यांना सांगितले.

पंजाबमधील काही वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमधून गजेंद्र पाकिस्तानातील तुरुंगात असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर आपण तातडीने पावले उचलून गजेंद्र यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले, असे जयपूरचे खासदार रामचरण बोहरा यांनी सांगितले.

दोन महिन्यांऐवजी ३६ वर्षे तुरुंगात

राजस्थानातून बेपत्ता झालेले गजेंद्र पाकिस्तानातील तुरुंगात कसे पोहोचले ते समजलेले नाही. त्यांना पाकिस्तानात दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, त्यांना वकील मिळाला नाही. त्यामुळे गेली ३६ वर्षे ते लाहोरमधील तुरुंगात खितपत होते. एखाद्या रहस्य कथेसारखी गजेंद्र याच्या जीवनातील या घडामोडी आहेत. मात्र, शेवट गोड तर सर्वच गोड या म्हणीप्रमाणे जीवनातील अखेरच्या टप्प्यातील काही ते क्षण ते कुटुंबासोबत व्यतीत करणार आहेत.