आता स्वस्तात जा मामाच्या गावाला, ‘या’ ट्रेनचे तिकीट दर होणार कमी

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

राजधानी, शताब्दी आणि दुरंतो या ट्रेन्सच्या तिकीटांची किंमत कमी करण्यात आली आहे. सरकारने ट्रेनमध्ये विकल्या जाणाऱ्या खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि तिकिटासोबत बूक केले जाणाऱ्या जेवणावरील टॅक्स कमी केला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने जीएसटी बाबत एक पत्रक जारी केलं होतं. यामध्ये रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंवर केवल ५ टक्के जीएसटी लागू केला जाणार आहे. याआधी ट्रेनमधील खाण्यापिण्याच्या पदार्थांवर १८ टक्के जीएसटी आकारला जात होता.

राजधानी, शताब्दी, दुरंतो यांसारख्या ट्रेनचे भाडं कमी झालं कारण, या ट्रेनच्या तिकीटामध्येच जेवणाचे पैसे आकारले जात होते. नव्या दरानुसार, फर्स्ट एसी आणि एक्झिक्युटीव्ह चेअर कारमध्ये नाश्ता ९० रुपयात मिळणार आहे. तर सेकंड एसी, थर्ड एसी आणि चेअर कारमध्ये नाश्ता ७० रुपयात मिळणार आहे. दुरंतो स्लीपरमध्ये तो ४० रुपयात मिळेल. याशिवाय फर्स एसी आणि एक्झिक्युटीव्ह क्लासमध्ये जेथे रात्रीचं जेवण दिलं जाईल तेथे संध्याकाळचा चहा ४५ रुपयांना मिळेल, तर जेथे रात्रीचं जेवण दिलं जाणार नाही तेथे चहा ७० रुपयांना मिळेल.

दुपारचं आणि रात्रीचं जेवण यांची किंमत ट्रेन आणि डब्यांवर अवलंबून आहे. यामध्ये जेवण ७५ रुपयांपासून १४० रुपयांपर्यंत मिळणार आहे. दुरंतो वगळता इतर ट्रेन्समध्ये कॉम्बो मील ७० रुपयांना मिळणार आहे. पाच टक्के जीएसटीचे दर गतीमान, शिवालिक आणि तेजस एक्सप्रेसमध्येही लागू होणार आहे.