हिंदुस्थानची साखर जगात नंबर वन ठरणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

जगातील सर्वाधिक साखर खाणारा देश’ अशी ओळख असलेला हिंदुस्थान आता साखरेच्या उत्पादनातही जगात नंबर वन ठरणार आहे. आतापर्यंत साखरेच्या उत्पादनात नंबर एकवर असलेल्या ब्राझीलमध्ये 2018-19 च्या ऊस गाळप हंगामात 310 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होऊ शकणार आहे, तर हिंदुस्थानातील उसाचे क्षेत्र वाढल्याने चालू वर्षी सर्वाधिक 355 लाख मेट्रिक टन एवढे साखरेचे विक्रमी उत्पादन होईल असा नॅशनल शुगर फेडरेशनचा अंदाज आहे. त्यामुळे हिंदुस्थान जगातील सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश ठरणार आहे.

आतापर्यंत ब्राझीलमध्ये सर्वाधिक साखरेचे उत्पादन होत असल्याने जागतिक बाजारपेठेत त्यांचेच वर्चस्व होते. एकीकडे साखरेचे उत्पादन वाढत असतानाच बाजारात साखरेचे दर घसरत चालले आहेत. त्यामुळेच ब्राझीलमधील साखर कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉलच्या उत्पादनावर भर दिला आहे. त्यामुळेच त्यांच्या एकूण साखर उत्पादनात घट होणार आहे. तर हिंदुस्थानातील साखरेचा उतारा आणि उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे देशातील साडेचारशेहून अधिक साखर कारखाने चालू वर्षी सुमारे 1 हजार 50 लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपातून 355 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन करतील असा अंदाज आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 35 लाख मेट्रिक टन एवढे उत्पादन वाढणार आहे. मागील वर्षीच्या साखर उत्पादनात एकटय़ा महाराष्ट्राचा वाटा 107 लाख मेट्रिक टन एवढा होता. दरम्यान, देशातील उसाचे क्षेत्र वाढले असले तरी सध्या महाराष्ट्राच्या काही भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने साखर उत्पादनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

सरप्लस साखरेचे टेन्शन
देशात साखरेचे उत्पादन वाढणार असल्याने कारखान्यांना सरप्लस साखरेचा सामना करावा लागणार आहे. चालू वर्षी 355 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार असले तरी देशांतर्गत साखरेचा वापर 250 लाख मेट्रिक टन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दर कमी असल्याने कारखान्यांनी साखर निर्यात न केल्यास सुमारे 100 लाख मेट्रिक टन साखर पडून राहणार आहे. ही सरप्लस साखर देशातील कारखान्यांसाठी टेन्शनची ठरणार आहे.