ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटकांवर मर्यादा?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ताजमहाल पाहण्यासाठी जाणाऱ्या हिंदुस्थानी पर्यटकांसाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दररोज ४० हजार हिंदुस्थानी पर्यटक ताजमहाल पाहू शकणार आहेत. ही मर्यादा येत्या २० जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे.

जगातील आश्चर्यांपैकी एक असलेला हिंदुस्थानातील ताज महाल पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली येथे मंगळवारी झालेल्या वरिष्ठ प्रशासक अधिकारी, एएसआय अधिकारी, पोलीस, पैरामिलिटरी अधिकारी यांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हिंदुस्थानी पर्यटकांसाठी ४० हजार मर्यादा ठेवण्यात आली आहे मात्र, विदेशी पर्यटाकांसाठी अशी कोणत्याही मर्यादेची संख्या निश्चित करण्यात आली नाही.

या ४० हजार मर्यादेच्या संख्येत लहान मुलांचा देखील समावेश असणार आहे. १५ वर्षांखालील कमी वयोगट असलेल्या मुलांना ‘झिरो चार्ज’ तिकीट देण्यात येणार आहे, म्हणजेच लहान मुलांना कोणतेही शुल्क लागू करणार नसल्याचे वृत्त आहे. याशिवाय पर्यटकांना ताजमहालसोबत मुख्य तहखाने पाहायचे असल्याचे त्यासाठी १०० रुपये तिकिट, तर तहखाने पाहायचे नसल्यास ५० रुपये तिकिट आकारण्यात येणार आहे. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत २० हजार तर, दुसऱ्या फेरीत दुपारी १२ पासून संध्याकाळपर्यंत २० हजार पर्यटक ताजमहाल पाहू शकतील.

विदेशी पर्यटाकांसाठी तिकिटाची किंमत हजार रुपये असून जे हिंदुस्थानी पर्यटक ४० हजार पर्यटकांनंतर देखील ताजमहाल पाहू इच्छितात त्या पर्यटाकांसाठी हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवसांत जवळपास ६० ते ७० हजार पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येतात. पर्यावरणाच्यादृष्टीने तसेच गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी या दृष्टीनेदेखील हा निर्णय घेण्यात आला असल्याचे एका इंग्रजी वृत्ताने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.