चीनचा बदला घेतला, आशिया चषकावर हिंदुस्थानची मोहोर

सामना ऑनलाईन । काकामिघारा (जपान)

जपानच्या काकामिघारा येथे झालेल्या महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने चीनचा पेनल्टी शूटआऊटवर ५-४ असा पराभव करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. हिंदुस्थानी रणरागिणींनी तब्बल १३ वर्षानंतर आशिया चषकावर नाव कोरले आहे.

अंतिम सामन्यात सुरुवातीपासून दोन्ही संघाने सावध खेळ केला. सामन्याच्या २५व्या मिनिटाला नवज्योत कौरने शानदार गोल करत हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्यांतरापर्यंत ही आघाडी कायम होती.

मध्यांतरानंतर तिसऱ्या सत्रात चीनने पलटवार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानी बचाव फळीने हा प्रयत्न यशस्वीरित्या परतावून लावला. त्यानंतर चौथ्या आणि अंतिम सत्रात ४७व्या मिनिटाला चीनच्या टियांजिन लुओने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. शेवटच्या काही मिनिटात दोन्ही संघाने विजयी गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र सामना बरोबरीत सुटला.

सामना १-१ असा बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआऊटद्वारे सामन्याचा निकाल लावाला लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये हिंदुस्थानी महिलांनी चीनचा ५-४ असा पराभव करत विजयावर शिक्कामोर्तब केला.

याआधी हिंदुस्थानी महिला संघाने २००४मध्ये आशिया चषक जिंकला होता. तर, १९९९ आणि २००९मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २००९मध्ये झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात चीनने हिंदुस्थानचा ५-३ असा पराभव केला होता. या पराभवाचा बदला हिंदुस्थानने घेतला आहे.