हिंदुस्थानी महिलांनी जिंकली दक्षिण कोरियाविरुद्धची हॉकी मालिका

69

सामना ऑनलाईन । जिनचेऑन

हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने पिछाडीवरून मुसंडी मारत दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव करून उभय संघांमध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या हॉकी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

ली सेउंगजूने 19 व्या मिनिटाला केलेल्या मैदानी गोलच्या बळावर कोरियाने आघाडी घेतल्यानंतर कर्णधार राणी रामपालने (37 व्या मिनिटाला) हिंदुस्थानला बरोबरी साधून दिली. त्यानंतर नवज्योत कौर हिने 50 व्या मिनिटाला हिंदुस्थानच्या खात्यात दुसऱ्या मैदानी गोलची भर टाकत विजय मिळवून दिला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमणावर भर देत पेनल्टी कॉर्नरची कमाई केली, मात्र गोलरक्षकांनी आपापली भूमिका चोख बजावत कोणत्याही संघाला आघाडी घेऊ दिली नाही. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच कोरियाने खाते खोलले. सेऊगजू हिने अप्रतिम मैदानी गोल करत आपल्या संघाला आघाडीवर आणले. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात हिंदुस्थानने प्रत्येकी एक गोल लगावत विजय मिळवला. उभय संघांमधील पहिला सामना हिंदुस्थानने 2-1 अशा फरकाने जिंकला होता. आता अखेरचा सामना शुक्रवारी खेळवण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या