हिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने पाहुण्या इंग्लंड संघावर पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला. जेमिमाह रॉड्रिग्ज व कर्णधार मिताली राज यांची उपयुक्त फलंदाजी, झुलन गोस्वामीची अष्टपैलू चमक आणि एकता बिष्ट हिची अफलातून गोलंदाजी ही हिंदुस्थानच्या विजयाची प्रमुख वैशिष्ट्यै ठरली.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 203 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना इंग्लंडचा डाव 41 षटकांत 136 धावांत गारद झाला. शिखा पांडे, दीप्ती शर्मा व झुलन गोस्वामी या हिंदुस्थानी त्रिकुटाने इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला जखडून ठेवण्यात यश मिळवले.  त्यानंतर एकता बिष्ट हिने इंग्लंडचे शेपूट गुंडाळता 4 बळी टिपले. तिने त्याआधी जेमिमाह रॉड्रिग्ज (48) व स्मृती मंधाना (24) यांनी 69 धावांची दमदार सलामी दिली. त्यानंतर मिताली राज (44), तानिया भाटिया (25) व झुलन गोस्वामी (30) यांनीही सुरेख फलंदाजी केली.