पगार वाढेल, महागाई कमी होईल, चांगली नोकरी मिळेल, हिंदुस्थानी बनले आशावादी!

2

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानातील नागरिकांचे नैराश्य कमी झालंय. भविष्यकाळाविषयी हिंदुस्थानींच्या मनात आशावाद निर्माण झाला आहे. पगारवाढ, महागाई कमी होणे आणि भविष्यात चांगली नोकरी मिळेल याची आशा लोकांच्या मनात वाढीस लागली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) कन्झ्युमर कॉन्फिडन्स सर्वेक्षणातून देशातील नागरिकांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला आहे.

सतत पैसा नाही, नोकरी नाही, महागाई वाढली याबाबत तक्रार करताना आपल्याला अनेक जण दिसतात. मात्र ही परिस्थिती हळूहळू बदलत आहे. सध्याचा काळ आपला नसला तरी येणारा काळ आमचाच आहे असा विश्वास लोकांना वाटू लागला आहे. आरबीआयच्या सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की, सध्याच्या काळात नागरिक निराशावादी आहेत. मात्र येणाऱया काळाविषयी त्यांचे विचार बदलले आहेत. आपली आर्थिक स्थिती बदलले असा विश्वास त्यांना वाटतोय. सर्वेक्षणात लोकांनी मान्य केलंय की, 2018 साली त्यांचे उत्पन्न वाढले नसले तरी भविष्यात ते नक्कीच वाढेल. महागाई कमी होईल अशी आशाही लोकांना आहे.

आरबीआयने 13 मोठय़ा शहरांमध्ये सर्वेक्षण केले. यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनौ, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, गुवाहाटी, जयपूर, पाटणा आणि थिरुअनंतपुरम या शहरांचा समावेश होता. सर्वेक्षणात 5347 लोक सहभागी झाले. त्या सर्वांना आर्थिक स्थिती, उत्पन्न आणि खर्च, रोजगाराच्या संधी आणि भविष्यकाळ याविषयी प्रश्न विचारण्यात आले.