INDvENG रणरागिणींनी दाखवली ‘एकता’, पाहुण्या इंग्लंडवर दणदणीत विजय

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानची डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिष्टच्या दमदार कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थानच्या महिला संघाने आयसीसी महिला चॅम्पियनशीप स्पर्धेची झोकात सुरुवात केली. शुक्रवारी मुंबईत झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात हिंदुस्थानने पाहुण्या इंग्लंडवर 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

हिंदुस्थानने विजयासाठी दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 41 षटकात 136 धावांमध्ये गारद झाला. इंग्लंडकडून नताली सायवरने 66 चेंडूत 44, तर कर्णधार हिथर नाईटने नाबाद 39 धावा केल्या. हिंदुस्थानकडून फिरकी गोलंदाज एकता बिष्टने सर्वाधिक चार बळी घेतले. तर दिप्ती शर्माने दोन, व झुलन गोस्वामीने एक बळी घेतला. या विजयासह हिंदुस्थआनने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली.

याआधी प्रथम फंलदाजी करताना सलामीवीर जेमिना रॉड्रिग्ज 48, कर्णधार मिथाली राज 44 आणि झुलन गोस्वामीच्या शेवटच्या षटकातील फटकेबाजीच्या जोरावर 49.4 षटकात 202 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. स्मृती मंधानाने 24 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज सायवर, फिरकी गोलंदाज सोफी आणि जॉर्जिया एलविस यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हिंदुस्थानचे तीन फलंदाज धावचित झाले.