श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्यासाठी ‘विराट’सेना सज्ज

सामना ऑनलाईन । कोलंबो

हिंदुस्थान-श्रीलंका पाचवा वन-डे सामना आज आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबो येथे रंगणार आहे. याआधीच्या चार सामन्यांमध्ये हिंदुस्थाननं श्रीलंकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे पावचा वनडे सामना जिंकून कसोटी मालिकेप्रमाणेच वनडे मालिकेतही श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची सुवर्णसंधी हिंदुस्थानला आहे.

चौथ्या सामन्यात मनीष पांडे, कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांना संधी दिली होती. या सामन्यात त्यांनी चांगली कामगिरी केल्याने पाचव्या वन-डेतही त्यांच्या कायम राहण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्याच्या जागी केदार जाधवला संधी मिळू शकते. रोहित शर्माने सलग दोन शतक ठोकली आहेत. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी जबरदस्त फॉर्मात आहेत. शिखर धवनची आई आजारी असल्याने तो मायदेशी परतला आहे. त्यामुळे लोकेश राहुल सलामीला येऊ शकतो किंवा अजिंक्य रहाणेलाही संधी मिळू शकते.

श्रीलंकेला २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये थेट पात्र ठरण्यासाठी हिंदुस्थानविरुद्धच्या दोन लढती जिंकणे आवश्यक होते. मात्र, चौथ्य़ा सामन्यातही पराभव झाल्यानं त्यांची थेट पात्र होण्याची संधी हुकली आहे. श्रीलंकेच्या चाहत्यांनी संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंची बस रोखणे, मैदानात बाटल्या फेकणे असे प्रकार घडले आहेत. तेव्हा आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी श्रीलंकेला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.

श्रीलंका संघ २०१४मध्ये हिंदुस्थान दौऱ्यावर असतांना हिंदुस्थाननं पाच सामन्यांची मालिका ५-० अशी जिंकली होती. मागील तीन वर्षांत हिंदुस्थानने एकाही संघाविरुद्ध व्हाइटवॉश मिळवलेला नाही. हिंदुस्थानने २०१३मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ५-० असा मालिका विजय मिळवला आहे. तत्पूर्वी, भारताने २०११मध्ये भारतात इंग्लंडला ५-०ने धुळ चारली आहे, तर २०११ मध्ये न्यूझिलंडला व्हाईटवॉश दिला आहे.