अरे बाप रे! हरवलेली महिला सापडली अजगराच्या पोटात

18
प्रातिनिधिक फोटो


सामना ऑनलाईन । जकार्ता

इंडोनेशियामध्ये एका महिलेचा शोध अजगराचे पोट फाडल्यानंतर संपला आहे. गेल्या दोन दिवसांपासून गायब असलेली महिला अजगराच्या पोटामध्ये सापडली आहे. इंडोनेशियाच्या समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या मुना आयलँडवरील पर्सियापन लावेला गावातील ही घटना आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशिया पोलिसांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वा टिवा नावाची ५४ वर्षीय महिला दोन दिवसांपूर्वी (१४ जून) गायब झाली होती. त्या रात्री बागेमधील भाजीपाल्याची देखभाल करण्यासाठी गेलेली टिवा परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, हरवलेल्या महिलेच्या शोधासाठी पोलीस आणि कुटुंबीयांसह अन्य १०० लोक कामाला लागले होते.

महिला गायब झाली त्या ठिकाणी तिची चप्पल आणि कुऱ्हाड पोलिसांना सापडली. तसेच या ठिकाणापासून जवळपास ३० फुटांवर एक २३ फुटांचा भला मोठा अजगरही आढळून आला. अजगराचे फोट प्रचंड मोठ्या प्रमाणात फुगलेले दिसून आल्याने गावकऱ्याना संशय आला. गावकऱ्यांना अजगराचे पोट फाडले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. २३ फुटांच्या या महाकाय अजगराच्या पोटामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला.

आपली प्रतिक्रिया द्या