गुन्हा कबूल करवून घेण्यासाठी आरोपीच्या गळ्यात लटकवला साप…

9


सामना ऑनलाईन । पापुआ

आरोपीकडून सत्य उकळण्यासाठी पोलिसांना अनेक शकला लढवाव्या लागतात. तर कधी कधी थर्ड डिग्रीचाही वापर करावा लागतो. पण इंडोनेशियन पोलिसांनी एका आरोपीवर त्याला केलेल्या गुन्ह्याची कबूली देण्यासाठी तसेच आपल्याला अपेक्षित उत्तर त्याच्याकडून वदवून घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. यासाठी पोलिसांनी आरोपीच्या गळ्यात जीवंत साप लटकवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ तुरुंगातला असून यात मोबाईल चोरणाऱ्या आरोपीची पोलीस चौकशी करत असताना दिसत आहेत. पोलीस आरोपीला त्याने आतापर्यंत किती वेळा मोबाईल चोरले असा प्रश्न विचारत आहेत. त्यावर दोनदाच मोबाईल चोरल्याचे आरोपी पोलिसांना सांगताना दिसत आहे. पण त्याच्या उत्तरामुळे समाधान न झाल्याने एका पोलिसाने आरोपीच्या गळ्यातच भलामोठा साप लटकवल्याचे दिसत आहे. साप बघताच घाबरलेला आरोपी रडू लागतो. मी फक्त दोनदाच चोरी केल्याचे तो पोलिसांना वारंवार सांगतो पण पोलीस तरीही त्याचे ऐकत नाहीत. उलट आता तुझ्या पँटीत साप सोडणार अशी धमकी त्याला देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी पोलिसांच्या या वर्तणुकीवर आक्षेप घेतला आहे. पोलिसांचे हे वागणे अमानूष असल्याने या पोलिसांवरच कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेची दखल घेत इंडोनेशिया पोलिसांनी जाहीर माफी मागितली असून आरोपीला सोडून दिल्याचे सांगितले आहे. तसेच संबंधित पोलिसांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचेही सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या