सिंधू, श्रीकांतने केली महा मेट्रोची सफर

सामना ऑनलाईन । नागपूर

शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झालेले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत, साईप्रणीत आणि त्यांचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी आज नागपूरमध्ये सुरू होत असलेल्या महा मेट्रोला भेट देऊन साऊथ एअरपोर्ट स्टेशन ते मिहान डेपोपर्यंत प्रवास करून नागपूरच्या मेट्रोचा आनंद लूटला आणि या खेळाडूंनी नागपूर मेट्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.

डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूर मेट्रोच्या तीन डब्ब्यांची सफर आज हिंदुस्तानातील दिग्गज खेळाडू पी. व्ही. सिंधू, कादंबी श्रीकांत, साईप्रणीत आणि प्रशिक्षक गोपीचंद यांनी वर्धा मार्गावरील साऊथ एअरपोर्ट स्टेशनला भेट दिली. यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी खेळाडूंचे स्वागत केले. यावेळी खेळाडूंसोबत बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी उपस्थित होते. दीक्षित यांनी मेट्रोबाबत खेळाडूंना सविस्तर माहिती दिली. शहरात खाजगी वाहतूक सुविधांपेक्षा सार्वजनिक वाहतुक सुविधांना अधिक वाव देण्याची गरज आहे. भविष्यात हे साध्य करण्यासाठी महा मेट्रो उपयोगाची ठरणार आहे.

भविष्यात शहराची लोकसंख्या आणि व्याप वाढणार आहे त्यासाठी नागरिकांना उपयुक्त ठरेल अशी ही मेट्रो राहणार आहे अशी माहिती दीक्षित यांनी दिली. सर्व खेळाडूंनी साऊथ एअरपोर्ट रेल्वेस्टेशन ते मिहान डेपोपर्यंत वातानुकुलित मेट्रोने प्रवास केला. मेट्रोच्या सुविधा उत्तम असल्याचे सांगून पी. व्ही सिंधू म्हणाली की, नागपूर मेट्रो नागपूरकरांकरिता उपयुक्त ठरणार असून नागपूरकरांना माझ्या व सर्व सहकाऱ्यांच्या शुभेच्छा आहेत. या दिग्गज खेळाडूंना पाहण्याकरिता मिहान डेपो परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.

बॅडमिंटन बाबत बोलताना पी. सिंधू म्हणाली की, येणाऱ्या स्पर्धेमध्ये मला भरीव कामगिरी करून दाखवायची आहे, त्यासाठी मी माझे लक्ष खेळाकडेच केंद्रीत केले आहे. ऑरेंजसिटी मला फार आवडली. क्रीडा क्षेत्राला उपयुक्त वातावरण मला नागपुरात दिसून आले. नागपुरातून उद्योन्मुख खेळाडू पुढे येतील याचा मला विश्वास आहे.