माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा 

86

>>स्पायडरमॅन

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणारी गुन्हेगारी आणि सोशल मीडियाचा होणारा गैरवापर याबद्दल जगभरच चिंता व्यक्त केली जात आहे. हिंदुस्थानात नुकत्याच व्हॉट्सऍप आणि फेसबुकसारख्या इतर काही सोशल मीडिया वेबसाइट्सवरून पसरलेल्या अफवांनंतर जमावाने केलेल्या हल्ल्यात काही निर्दोष लोकांचा मृत्यू झाला आणि हा विषय चांगलाच ऐरणीवर आला. काही दिवसांपूर्वीच माहिती तंत्रज्ञान खात्यातील ज्येष्ठ अधिकारी आणि फेसबुक, गुगल, ट्विटर, व्हॉट्सऍपसारख्या महत्त्वाच्या सोशल मीडिया कंपन्यांची एक मीटिंग पार पडली. यात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि त्यातील गरजेच्या सुधारणा यावर महत्त्वाची चर्चा करण्यात आली. फेसबुक, गुगल, ट्विटरसारखी सोशल सेवा देणाऱया वेबसाइट्स आणि व्हॉट्सऍपसारखे मेसेंजर यांना आता अशी काही खास व्यवस्था करावी लागणार आहे की, ज्याद्वारे बेकायदा गोष्टींची, जसे की, अफवा पसरवणाऱया पोस्ट, मॉर्फ केलेले फोटो, द्वेषभावना भडकवणारे लेखन इत्यादींची लगेच ओळख पटू शकेल आणि त्यांच्यावर तातडीने कारवाई करणे शक्य होईल. 2019 च्या वर्षात देशातील सर्वात महत्त्वाच्या निवडणुकादेखील येत असल्याने या काळात सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज माहिती तंत्रज्ञान खात्याने व्यक्त केली आहे. अशा प्रकारे सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्ससारख्या प्रभावशाली तंत्रज्ञानाची मदत घेण्याची सूचनादेखील या कंपन्यांना करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने काही केंद्रीय एजन्सीजना युजर्सच्या कॉम्प्युटर्सवर आणि सोशल मीडियाच्या वापरावर लक्ष ठेवण्याचे अधिकार प्रदानदेखील केले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी चांगलीच आगपाखड केली आणि हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोपदेखील केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या