महाराजांचा गड- श्रीमान ‘रायगड’

>>रतींद्र नाईक

आज श्रीमान रायगडावर आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला. यानिमित्ताने रायगड जाणून घेऊया…

गडावर नुकतेच उत्खनन करण्यात आले असून या उत्खननात दुर्मिळ ऐतिहासिक खजिनाच पुरातत्त्व विभागाच्या हाती लागला आहे. यामध्ये तोफांचे गोळे, बंदुकीची काडतुसे, जुनी नाणी, पुरातन खिळे आदी ऐतिहासिक अवशेष सापडले आहेत. सध्या गडावरील हत्तीखनात ठेवण्यात आलेले हे अवशेष पर्यटकांना व इतिहासप्रेमींना प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्यापासून पाहता येतील.

हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. ६ जून १६७४ रोजी महाराजांचा शिवराज्याभिषेक किल्ल्यावर झाला. शिवप्रेमी संस्था आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने आज हा सोहळा मोठय़ा थाटात रायगडावर पार पडेल, परंतु या सोहळय़ाव्यतिरिक्त किल्ल्यावर इतरही अनेक बाबी पाहण्यासारख्या आहेत. चला तर त्यांची माहिती घेऊया…

कोकणच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱया आणि महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ओळखल्या जाणाऱया रायगड किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. शिवराज्याभिषेक सोहळय़ानिमित्त या गडाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. गडावर या सोहळय़ात आज विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळय़ाच्या पूर्वतयारीनिमित्त गडावर रायगड प्राधिकरणामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या भागातील कचराही क्लाइम्ब मर्जर ट्रेकर्सनी जमा केला असल्याची माहिती रायगड प्राधिकरणाचे सदस्य सनी ताठेले यांनी दिली. महाडमधील पाचाड गावात राजमाता जिजाऊ यांचे समाधीस्थळ तसेच वाडा आहे. या समाधीस्थळाला भेट दिल्यानंतर गडावर चढता येते. पाचाड गावापासून साधारण अडीच कि.मी. अंतरावर रायगड वसला आहे. गडावर चढण्यासाठी १४०० पायऱ्या आहेत. याव्यतिरिक्त रोपवेचीही व्यवस्था आहे.

किल्ल्यावर जातेवेळी खुबलढा बुरूज लागतो, तर डाव्या बाजूस टकमक टोक दिसते. नगारखान्यापुढे होळीच्या माळाजवळ असलेल्या शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळय़ासमोर नतमस्तक झाल्याशिवाय येथून शिवप्रेमी निघत नाहीत. माळाच्या जवळच जगदीश्वराचे मंदिर आणि शिकाई देवीचे मंदिर आहे. जगदीश्वराच्या मंदिरापासून जवळच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. याशिवाय गडावर शिवप्रेमींना आकर्षित करण्यासाठी अनेक स्थळे आहेत. त्यामध्ये मातेचे मंदिर, चित्त दरवाजा, टकमक टोक, रामेश्वर मंदिर, बारा टाकी, हिरकणी बुरुज, राजभवन, राणीवसा, बाजारपेठ नजरेत भरण्यासारखी आहेत.