पतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नोयडा

दिल्लीतील नोयडा भागात एका 21 वर्षीय महिलेवर तिच्या पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिलेने तिचे सासरे, दीर व नणंदेच्या नवऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या महिलेच्या पतीचे जानेवारी महिन्यातच निधन झाले आहे.

पीडित महिला ही मूळची उत्तर प्रदेशमधील अलीगढची असून दोन वर्षापूर्वी लग्न झाल्यानंतर ती पतीसोबत दिल्लीत स्थायिक झाली होती. पीडित महिलेच्या पतीचे 20 जानेवारीला निधन झाले होते. त्यानंतर तिच्या पालकांनी तिला माहेरी नेण्याबाबत विचारले. मात्र सासरच्यांनी नकार दिल्याने ती दिल्लीतच राहू लागली. त्यानंतर एके दिवशी सासरे व तिच्या दिराने तिला जबरदस्ती झोपेच्या गोळ्या खायला घालून तिच्यावर बलात्कार केला. गेल्या महिनाभरापासून ते तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत होते.

काही दिवसांनी जेव्हा पीडित महिलेच्या माहेरची मंडळी तिला भेटायला आली तेव्हा सासरच्यांनी त्यांना भेटू दिले नाही. तसेच पीडित महिलेचा बाजाराच्या ठिकाणी भजीचा स्टॉल होता. तेथेही ते तिला पाठवत नव्हते. त्यामुळे महिलेच्या पालकांना संशय आल्याने त्यांनी मुलीला भेटता यावे म्हणून पोलिसांना घेऊन त्यांचे घर गाठले. पोलिसांनी त्या महिलेची सासरच्या मंडळींच्या तावडीतून सुटका करत तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी सासरा, दिर व नणंदेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून महिलेचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार आहे.