इन्स्टाग्रामवरही विराटची कोटीच्या कोटी उड्डाणे

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इन्स्टाग्रामवर एखादी पोस्ट शेअर केली तर आपल्या पोस्टला फार तर लाईक्स आणि कमेंट भेटतील पण जगभरात अशा काही व्यक्ती आहेत ज्यांच्या एका पोस्टसाठी इंस्टाग्राम त्यांच्यावर कोट्यवधींची बरसात करते. अशा व्यक्तींच्या यादीत हिंदुस्थानच्या क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली सध्या अग्रस्थानी आहे. विराट खेळातून व जाहिरातीतून तगडी कमाई करत असतानात इन्स्टाग्राम देखील त्याला एका प्रमोशनल पोस्टसाठी तब्बल तीन कोटी रूपये देते. फोर्ब्स मासिकाने याबाबत माहिती दिली असून इन्स्टाग्रामवरील पोस्ट वरून कमाईच्या बाबतीत विराटने जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे.

हिंदुस्थानच्या क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. त्याच्या नेतृत्त्वाखील संघाची कामगिरी चांगली होत आहे. त्यामुळे विराट सध्या मोठ्या मोठ्या ब्रॅण्डचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. जाहिरातीच्या शूटिंगसाठी तो एका दिवसाचे पाच कोटी रुपये घेतो. विराट फॅन फॉलोईंग सोशल मीडियावर पण बरीच आहे. सध्या त्याचे इंस्टाग्रामवर दीड कोटी फॉलोअर्स आहेत तर ट्विटरवर दोन कोटी युजर्स त्याला फॉलो करतात. त्याच्या याच प्रसिद्धीचा फायदा प्रमोशनल पोस्टसाठी व्हावा व त्यातून इंस्टाग्राम व संबंधित ब्रॅण्डसची प्रसिद्धी व्हावी म्हणून इन्स्टाग्राम त्याला एका पोस्टसाठी ३ कोटी २० लाख रूपये देत आहेत.