चोरट्यांनी पैसे समजून पळविल्या 12 वीच्या उत्तर पत्रिका

सामना प्रतिनिधी । निलंगा

निलंगा बसस्थानकासमोरील बोलोरो गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी पैशाची बॅग समजून चक्क 12 वीच्या उत्तर पत्रिकांचा गठ्ठाच पळविण्यात आला. ही खळबळजनक घटना भर दुपारी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. शहर पोलीस ठाण्याचे नुतन पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांना जणू चोरट्यांनी आगळीवेगळी सलामीच दिल्याची चर्चा रंगत आहे.

तालुक्यातील केळगाव येथील आनंदमुनी उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी 12 वी च्या उत्तर पत्रिकेचा गठ्ठा घेऊन नियमकाकडे जमा करण्यासाठी निघाले असता निलंगा येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती मार्केट शाखा या बॅंकेतून पैसे काढून मित्रासह बसस्थानकासमोर बोलोरो पार्क करून चहा घेण्यासाठी गेले. थोड्या वेळाने ते बाहेर आले असता गाडीची काच फुटलेली व समोरच्या टायरमधील हवा गेलेली दिसली. यावेळी गाडीतील जवळपास 50 ते 60 उत्तर पत्रिकेचा गठ्ठा चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. संबंधित घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांना दिली असता त्यांनी त्या शिक्षकांनाच पत्रिका शोधण्यासाठी उदगीर मोड कासारशिरसी मोड बसस्थानक परिसरात जाण्यास सांगितले.

गुरुवार असल्याने शहरात बाजार असतो. त्यादरम्यान चोरट्यांची चांदीच असते. मोबाईल, पैसे, सोने अशा चोऱ्या गुरुवारी घडत असतात. चोरट्यांनी गुरुवारचे निमित्त साधून दुपारी दोनच्या दरम्यान शिक्षकांच्या गाडीचा पाठलाग बँकेपासूनच केला. चारचाकी गाडी असल्याने बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढल्याचा अंदाज बांधून ही चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.