जाधव कुटुंबीयांच्या अपमानासाठी लश्करने केलं आयएसआयचं अभिनंदन

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी यांना पाकड्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. पाकड्यांनी जाधव यांच्या आई आणि पत्नी यांचा केलेला अपमान म्हणजे आयएसआयचं कारस्थान असल्याचं बोललं जात आहे. एका हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रावळपिंडी येथे झालेल्या रॅलीदरम्यान लश्कर ए तोयबाने या कारस्थानासाठी आयएसआयचं अभिनंदन केलं आहे.

लश्कर ए तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजा याने आयएसआयला चलाख म्हणत जाधव यांच्या पत्नीच्या चपला उतरवण्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. हिंदुस्थानाला वाटत होतं की, जाधव यांची कौटुंबिक भेट समोरासमोर होईल. मात्र, आयएसआयने तसं होऊ दिलं नाही, असंही हमजा यावेळी म्हणाला. तसंच जाधव यांच्या पत्नीच्या चपलांमधून कॅमेरा मिळाल्याचा दावाही हमजाने केला आहे.