एशियाड पदक विजेत्या मराठी मुलींची उपेक्षा, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचे साधे ट्विटही

सामना ऑनलाईन, मुंबई

राष्ट्रीय नौकानयन महासंघातील वशिलेबाजीला तोंड देऊन जकार्ता एशियाडसाठीच्या नौकानयन संघात स्थान मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या श्वेता शेरवेकर आणि वर्षा गौतम या खेळाडूंनी रौप्यपदक मिळविण्याचा पराक्रम केला. त्यांच्या या यशाची केंद्र सरकारच नव्हे तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन त्यांचा गौरव केला, परंतु आपल्याच राज्यात महाराष्ट्रात मात्र त्या उपेक्षित राहिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या यशाचे कौतुक करण्याचे साधे सौजन्यही दाखविलेले नाही. राज्य सरकारच्या या उदासीन धोरणावर राज्यातील क्रीडाशौकिनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

श्वेता शेरवेकर आणि वर्षा गौतम ही नावे राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत अभिमानाने घेतली जातात. त्यांची जिद्द आणि मेहनत त्यांना जकार्ता एशियाडमध्ये नक्कीच स्थान मिळवून देईल असे सर्व क्रीडाप्रेमींना वाटत होते, परंतु राष्ट्रीय नौकानयन महासंघातील वशिलेबाजीच्या त्या बळी पडल्या; परंतु जकार्तात होणाऱ्या एशियाड स्पर्धेत सहभागी होण्याचा चंग बांधलेल्या या दोघींनी नौकानयन महासंघाबरोबर न्यायालयीन लढाई लढून एशियाडमध्ये स्थान मिळविलेच. प्रसिद्ध वकील अॅड. नीला गोखले यांनी न्यायालयात या दोघींची बाजू नेटाने लढवून त्यांचा जकार्ता एशियाडचा मार्ग सुकर केला.

महाराष्ट्राच्या असलेल्या या मुलींनी जकार्ता एशियाडमध्ये महाराष्ट्राचा झेंडा फडकवला. विशेष म्हणजे चीन आणि कोरियासारख्या बलवान प्रतिस्पर्ध्यांना नमवून त्यांनी रौप्यपदकही पटकावले, परंतु त्यांच्या या देदीप्यमान यशाची महाराष्ट्र सरकारला कोणतीही किंमत नाही. कारण महाराष्ट्र सरकारने त्यांची साधी दखलही घेतली नाही त्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

जकार्ता एशियाडमध्ये पदक मिळविणाऱ्या प्रत्येक राज्यातील खेळाडूंचे त्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील या गुणी मुलींचे कौतुक करण्यास वेळ नाही. या मुलींच्या यशाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा सत्कार करून अभिनंदनाचे ट्विटही केले.  केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही त्यांचा सत्कार केला, परंतु  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी साधे ट्विटदेखील केले नाही त्याबद्दल क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.