अंधेरीत आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाची रंगत

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईसह महाराष्ट्रातून ऑलिम्पिक खेळाडू तयार व्हावेत यासाठी युवासेनेने पुढाकार घेतला असून त्याअंतर्गत सोमवारपासून अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलात ‘युवा खेळ समिट – २०१८’ या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचा खेळ रंगू लागला आहे. यामध्ये जवळपास २०० कॉलेजांमधील ३५०० विद्यार्थ्यांनी १५ क्रीडा स्पर्धा शर्यतींमध्ये आपल्या खेळाची चुणूक दाखवली आहे. याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले.

‘युवा खेळ समिट’दरम्यान सोमवारी मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, तृप्ती सावंत, नगरसेविका किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव व सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, विनोद घोसाळकर या मान्यवरांची उपस्थिती होती. युवासेनेच्या कार्यकारिणीने हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आहे.

– महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंचा गौरव
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंना गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राला राष्ट्रीय चॅम्पियन बनवणारा कर्णधार रिशांक देवाडिगा, विशाल माने, तुषार पाटील, नीलेश साळुंखे या पुरुषांसह अभिलाषा म्हात्रे व सायली जाधव या स्टार महिला कबड्डीपटूंनाही सन्मानित करण्यात आले.

– पुढील कुंभमेळा तीन ते चार दिवसांचा
अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत अंधेरीत भव्यदिव्य क्रीडा महोत्सवाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले आहे, मात्र पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ‘युवा खेळ समिट’च्या दुसऱया सत्राच्या आयोजनासाठी प्रयत्न करण्यात येणार असून दोनऐवजी तीन ते चार दिवस क्रीडा महोत्सव रंगणार आहे.

मनसोक्त खेळा, उज्ज्वल भविष्य घडवा!
आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी भक्कम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली आहे. या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी स्पर्धांत सहभागी होणाऱया प्रत्येकाला मनसोक्त खेळा व उज्ज्वल भविष्य घडवा अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. क्रीडा समिटला उपस्थित हजारो विद्यार्थ्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणेने सभागृह दणाणून टाकत युवासेना प्रमुखांच्या आवाहनाचे स्वागत केले. यावेळी प्रत्येक खेळाच्या स्पर्धेचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

क्रीडा महोत्सवातील खेळ

 • फुटबॉल
 • रिंक फुटबॉल
 • कबड्डी
 • बॅडमिंटन
 • स्क्वॉश
 • ज्युडो
 • बॉक्सिंग
 • कॅरम
 • चेस
 • प्ले स्टेशन
 • बास्केटबॉल
 • टेबलटेनिस
 • व्हॉलीबॉल
 • बॉडीबिल्डिंग
 • स्वीमिंग