सेन्सेक्स, बजेट आणि सामान्य गुंतवणूकदार

118

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)mahesh-chavan-th

अर्थमंत्र्यांनी मागील आठवड्यात जाहीर केलेल्या अर्थसंकल्प २०१८ नंतर पुढच्याच दिवशी हिंदुस्थानी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही गेल्या ३ वर्षांतील मोठी घसरण दाखवली. एका बाजूला जाहीर केलेल्या बजेटमधून हाती काय लागले, हे पाहण्यात व्यस्त असणारा सामान्य गुंतवणूकदार दुसऱ्या दिवशी या बाजारातील घसरण पाहून पुरता हबकून गेला. कारण कधी नव्हे ते शेअर बाजार, मुच्युअल फंड या गुंतवणुकीत हिंदुस्थानातील मध्यमवर्ग सकारात्मक पावले उचलत असताना अशा घसरणीमुळे सामान्य गुंतवणूकदार घाबरून जातो. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ढिगभर मेसेज, व्हिडीओ आपल्या मोबाईल वर येत असतात, ते वाचून अजून यात भर पडते. यासाठी अशा परिस्थतीत सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे आणि काय करू नये, हे माहीत असणे गरजेचे आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीची भविष्यातील दिशा

प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बुफ्फेट सरांच्या मते सर्व गुंतवणूकदार एक चूक करतात ती म्हणजे उद्या किंवा भविष्यात बाजार काय असेल यासाठी ते खूप वेळ खर्ची घालतात. तासनतास टीव्ही पाहतात, वर्तमानपत्रे वाचतात, नियतकालिके वाचतात. पण तरीही भविष्यात मार्केट काय असेल १००टक्के हे सांगू शकत नाहीत. सांगायचा मुद्दा हा आहे, की एखाद्या मार्केटमध्ये झालेली पडझड-वाढ ही अमुक एका कारणाने किंवा तमुक एका कारणाने झाली, असे छातीठोकपणे सांगता येत नाही.

बजेट नंतर दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानी शेअर बाजारात झालेली घसरण पाहिली तर सामान्य गुंतवणूकदाराला वाटेल, की हे बजेटमुळेच झाले. पण अनुभवी गुंतवणूकदार सांगेल की काही अंशी याला बजेट जबाबदार आहे. तर त्याचबरोबर याला जागतिक बाजारातील घसरणही कारणीभूत आहे. अमेरिकेत पुढील दोन आठवड्यांत फेडरल रिझर्व व्याजदर वाढवण्याच्या तयारीत आहे त्याचा नकारात्मक परिणाम अमेरिकेच्या बाजारावर आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या बाजारावर झाला झाला. हिंदुस्थानी बाजाराने २०१४ पासून गेलं एक वर्ष सोडल्यास चांगली तेजी दाखवली आहे. काही शेअर्सने तर गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल करून सोडले आहे. त्यामुळे सेन्सेक्सच्या तेजीला काही काळापुरता लगाम लागणे साहजिकच आहे. फेब्रुवारीपासून जीएसटीसाठी ई-वे बिल सुरू झाले आहे, त्याचा परिणाम एप्रिल २०१८मध्ये दिसेल.

बजेट २०१८
अर्थसंकल्प २०१८ सादर करताना अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधांवर भर दिलेला दिसतोय. जसे आयुष्मान भारत योजना, रस्ते आणि बांधकाम क्षेत्रासाठी दिलेला निधी, आठ कोटी गरीब स्त्रियांना मोफत गॅस कनेक्शन, शिक्षणासाठी केलेली १ लाख कोटींची तरतूद, रेल्वेच्या विकासासाठी केलेली तरतूद. पण यातून सामान्य माणसाच्या पदरात डायरेक्ट काय पडले, असे म्हणाल तर ते म्हणजे याची अंमलबजावणी कशी होते ते पाहणे गरजेचे आहे.

या बजेटमधील एक नकारात्मक गोष्ट म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणुकीवर लागलेला LTCG म्हणजेच लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. जो आतापर्यंत शून्य होता. गेल्या ३ वर्षांत शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण, त्याचबरोबर मुच्युअल फंड कंपन्यांनी सामान्य गुंतवणूकदारापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न यांमुळे शेअर बाजारात मुच्युअल फंड गुंतवणुकीतून लोकांनी खोऱ्याने पैसा गुंतवला. कारण विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत असतानाही हिंदुस्थानी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीमध्ये वाढच दाखवली. या सकारात्मक वातावरणात लागलेल्या LTCG मुळे वातावरण थोडे गढुळ झाल्यासारखे झाले आहे.

१ लाखापुढील नफ्यावर १० टक्के LTCG म्हणजे नक्की काय जाणून घेऊया
समजा २०१७मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने १ लाख रुपये गुंतवले आहेत आणि २०१८ मध्ये या गुंतवणुकीचे २.२० लाख रुपये झालेले आहेत आणि खरेदी केल्यापासून या गुंतवणुकीला ३६५ दिवस म्हणजेच १ वर्ष पूर्ण झाले असेल आणि त्याने खरेदी केलेले शेअर्सची विक्री केली. म्हणजेच हा झालेला नफा Long Term Capital Gain म्हणून गणला जाईल. १ लाख मूळ मुद्दल आणि १.२० लाख हा LTCG असेल. या १.२० लाखमधील १ लाखावर कोणताच टॅक्स लागणार नाही तर उरलेल्या २०००० वर १० टक्के म्हणजेच २००० टॅक्स लागेल.

सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावे ?
सामान्य गुंतवणूकदार जर शेअर बाजारात डायरेक्ट शेअर्सची खरेदी विक्री करत असेल त्यांनी जास्तीत जास्त लक्ष आपल्या पोर्टफोलिओमधील कंपन्यांवर द्यावे, मग सेन्सेक्स किंवा निफ्टीच्या हालचालीवर द्यावे. कारण खूप वेळा चांगल्या कंपन्या आपली घोडदौड सुरू ठेवत असतात. मुच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी SIP च्या माध्यमातून आपली गुंतवणूक चालू ठेवावी. कारण SIP हा शेअर बाजार गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करायचा योग्य पर्याय आहे.

सेन्सेक्स, बजेट आणि सामान्य गुंतवणूकदार याचे नाते इथून पुढे वाढतच जाणार आहे. कारण माहिती तंत्रज्ञानाच्या जगात आज मिनिटभरात बातम्या पोहोचत असताना सामान्य गुंतवणूकदारांनी आपली आर्थिक ध्येयं लक्षात ठेऊन गुंतवणूक करणे गरजेचे आहे. शेअर बाजार गुंतवणूक ही दीर्घ काळात लाभदायी असल्यामुळे सेन्सेक्सचे रोजचे चढउतार पाहत बसणं चुकीचे आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना आर्थिक नियोजन कराची मदत घेऊनच गुंतवणूक करावी.

आपली प्रतिक्रिया द्या