संभाजीनगरचे प्रभारी पोलीस आयुक्त कामाला लागले

49

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संवेदनशील असलेल्या शहरातील कचरा प्रश्नावर किंवा अन्य कोणत्याही कारणाने निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळा. आपलेच दात, आपलेच ओठ आहेत याची जाणीव ठेवत पोलिसांनी थेट दंडुका न उगारता सुसंवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. कठोर भूमिका घेताना कायदा हातात घेऊ नका, असा सल्ला प्रभारी आयुक्त मिलिंद भांबरे यांनी आयुक्तालयात घेतलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. तसेच चमकोगिरी न करता कामगिरीवर भर देण्याचे संकेत त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.

मिटमिटा येथे कचराप्रकरणी आंदोलकांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले. त्यांचा पदभार विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे सोपवण्यात आला. पुण्यातील भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर शहरात १ ते २ जानेवारीदरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक, जाळपोळ व तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी अचानक पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे सिंगापूर वारीला गेल्याने त्यावेळी भारंबे यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. तेव्हा त्यांनी शहराची परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

पोलीस आयुक्त भारंबे यांनी पदभार घेतल्यानंतर आज आयुक्तालयातील उपायुक्त, सहायक आयुक्तांसह विविध ठाण्यांतील पोलीस निरीक्षकांची दुपारी तीन तास बैठक घेतली. या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, मागील काही महिन्यांत शहर अतिसंवेदनशील बनले आहे. कचराकोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांपाठोपाठ पोलीस प्रशासनाचीही झोप उडाली आहे. कोणत्याही क्षणी याचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सध्या शहरात कचऱ्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांशी सौजन्याने वागा, आपलेच दात, आपलेच ओठ आहेत याची जाणीव ठेवा, नागरिकांशी उद्धटपणे वागल्यास त्याचा परिणाम योग्य होणार नाही, परिस्थिती हाताळताना अतिरेक करू नका. आता पोलिसांनी जनसंपर्क वाढविण्याचा दृष्टीने पावले उचलावी. प्रत्येक ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आपापल्या ठाण्याच्या हद्दीत नागरिकांशी संवाद वाढवून कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनादेखील पोलीस आयुक्त भांबरे यांनी केल्या.

एक दुश्मन, एक गोळी असे वागू नका…
पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेताच भांबरे यांनी चार्ली पथक बरखास्त करून त्याचे आरसीपी अर्थात दंगा काबू पथकात विलीनीकरण केले. या आरसीपी पथकाला दंगा काबू पथकासारखे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. चार पथकात कार्यरत असलेल्या प्रत्येक तुकडीची जबाबदारी ही सहायक पोलीस आयुक्ताकडे राहणार आहे. भरतीनंतर जे प्रशिक्षण या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येते, तेच प्रशिक्षण पुन्हा देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना विशेष ड्रेस कोड राहील. जेथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल, तेथे तातडीने हे पथक पोहोचून त्या ठिकाणची परिस्थिती हाताळणार आहे. या पथकाला स्वतंत्र वाहने देण्यात येतील. शिवाय त्यांना दंगा संरक्षण कवच असलेले कोटही देण्यात येणार असल्याचे भारंबे यांनी सांगितले. शिवाय पोलिसांनी एक दुश्मन एक गोळी असे वागू नये, आर्मीत तसे चालते. येथे आपलेच लोक असतात. त्यामुळे संयम ठेवून परिस्थिती पाहून कठोर भूमिका घ्यावी, असेही आरसीपी पथकाला प्रक्षिणादरम्यान आम्ही शिकवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील आठवड्यापासून आयुक्त प्रत्येक ठाण्याला भेट देणार आहेत.

धाक दाखवून हेल्मेट सक्ती नको
दुचाकीस्वारांना हेल्मेट बाबत कायद्यापाठोपाठ जनजागरण अभियान राबवून महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. त्या एका क्षणासाठी हेल्मेट हे किती महत्त्वाचे असते हे जर दुचाकीस्वारास कळले तर तो आपोआप हेल्मेट वापरेल. कायदाचा धाक दाखवून हेल्मेट सक्ती करता येत नसते, असे म्हणत त्यांनी हेल्मेट सक्तीला बगल दिली.

आपली प्रतिक्रिया द्या