रशिया-पाकचे नवे लफडे

‘उरी’ हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘एकटे’ पाडले जात असल्याचे सतत सांगितले गेले. ते किती बकवास होते हे रशिया-पाक दरम्यानच्या नव्या लफड्यावरून लक्षात येते. आपला एकेकाळचा परममित्र आणि कायमस्वरूपी शत्रू दोघेही जाहीरपणे एकमेकांना मिठ्या मारत असताना स्वस्थ बसून कसे चालेल? या घडामोडींकडे डोळसपणे पाहतानाच रशियाचे ‘पाकडे’ पाऊल पुन्हा हिंदुस्थानकडे कसे वळेल याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा.

आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत अलीकडच्या काळात हिंदुस्थानने कशी क्रांतिकारक वगैरे पावले टाकली आहेत आणि जगभरातील देशांमध्ये हिंदुस्थानशी मैत्री करण्याची कशी स्पर्धा लागली आहे असे ढोल हल्ली सातत्याने वाजवले जातात. मात्र असा उद्घोष करण्यात धन्यता मानणार्‍या मंडळींनी व समस्त देशवासीयांनी चिंता करावी अशा घडामोडी रशिया आणि पाकिस्तानदरम्यान घडत आहेत. कधीकाळी एकमेकांचे तोंडही न पाहणारे रशिया आणि पाकिस्तान हे देश सातत्याने एकमेकांच्या जवळ येत आहेत. हिंदुस्थानने वारंवार सावध करूनही रशियाची पाकिस्तानशी वाढणारी जवळीक कमी होताना दिसत नाही. दोन दिवसांपूर्वीच इस्लामाबादेत पाकिस्तान आणि रशिया यांच्यात प्रथमच अनेक महत्त्वाच्या विषयांवर सल्लामसलत झाली. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कचेरीत झालेल्या या चर्चेत नेमकी कुठली वैचारिक देवाणघेवाण झाली हे अद्याप समोर आले नाही. मात्र जगभरातील देशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानशी चर्चा करावी असा ‘अविचार’ रशियाच्या मनात का यावा हेच मुळात एक कोडे आहे. वास्तविक रशिया हा हिंदुस्थानचा पारंपरिक आणि नैसर्गिक मित्र. यापूर्वी जेव्हा जेव्हा हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झाले तेव्हा प्रत्येक वेळी रशियाने हिंदुस्थानचीच बाजू घेतली. त्याच रशियाला आज
पाकिस्तान प्रेमाचे भरते
का येते आहे याचा विचार हिंदुस्थानातील धुरिणांनी करायला हवा. रशिया आणि पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळात इस्लामाबादेतील चर्चेत जागतिक आणि विभागीय विकासाशी संंबंधित मुद्द्यांवर बोलणी झाली, असे पाकिस्तानने जाहीर केले आहे. या दोन देशांदरम्यान बोलणी काय झाली हा विषय गौण आहे, मात्र या दोन देशांमध्ये जे काही शिजते आहे ते हिंदुस्थानची चिंता वाढवणारे आहे. केवळ चर्चा आणि हारतुरे एवढ्यापुरतेच हे संबंध राहिले नसून पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची विक्री करण्याचे कामही रशियाने सुरू केले आहे. पाकिस्तानला प्रभावी हल्ला करण्याची क्षमता असलेले लढाऊ हेलिकॉप्टर्स देण्याची ग्वाही रशियाने यापूर्वीच दिली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मागे आपल्या रशिया दौर्‍यात पाकिस्तानला शस्त्रास्त्रे आणि लष्करी साहित्य पुरवण्यास विरोध केला होता. तथापि हा विरोध झुगारून रशिया पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करीत आहे. शिवाय तीन महिन्यांपूर्वी पाकिस्तान आणि रशियन लष्कराने संयुक्त सरावदेखील केला. किंबहुना उभय देशांनी सप्टेंबर महिन्यात केलेला संयुक्त युद्धसराव हीच खरे तर हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा होती. या युद्धसरावाला हिंदुस्थानने आक्षेप घेतल्यानंतरही आपले काहीएक न ऐकता रशियाने प्रथमच पाकिस्तानसोबत लष्करी सराव केला. विशेष म्हणजे ‘उरी’ हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘एकटे’ पाडले जात असल्याचे सतत सांगितले गेले. ते किती
बकवास
होते हे रशिया-पाक दरम्यानच्या नव्या लफड्यावरून लक्षात येते. बहुधा हिंदुस्थान अमेरिकेच्या जवळ जरा जास्तच गेल्याचे शल्य रशियाला बोचत असावे. त्यामुळेच शत्रुराष्ट्र अमेरिकेने कडेवरून उतरवून दिलेले पाकिस्तानरूपी खोडकर बाळ आता रशियाने मांडीवर घेण्याचे ठरवलेले दिसते. कारणे काहीही असोत, पण हिंदुस्थान आणि रशियातील प्राचीन आणि नैसर्गिक मैत्रीला कुठेतरी सुरुंगच लागला. म्हणूनच रशियासारखा आपला मित्रदेश पाकिस्तानसारख्या ‘असंगा’शी ‘संग’ करतो आहे. १९८०च्या दशकात अमेेरिका आणि रशियातील शीतयुद्धाने शिखर गाठले असताना पाकिस्तान आणि रशियातही टोकाचे वैमनस्य निर्माण झाले होते. त्याच सुमारास रशियाने अफगाणिस्तानात आपल्या फौजा घुसवल्यामुळे पाकिस्तानचा अधिकच तीळपापड झाला होता आणि रशियासोबतचे त्यांचे संबंध आणखी ताणले गेले होते. मात्र वैराचा हा सगळा इतिहास विसरून रशिया आणि पाकिस्तान आज एकमेकांच्या जवळ येत आहेत. ही जवळीक आणखी वाढणार नाही अशी पावले आता हिंदुस्थाननेही टाकायला हवीत. पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकाकी पाडल्याची टिमकी आपण कितीही वाजवत असलो तरी कधीकाळी एकमेकांचे शत्रू असणारे रशिया आणि पाकिस्तान यांचे गुळपीठ गेल्या काही महिन्यांत वाढले आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. आपला एकेकाळचा परममित्र आणि कायमस्वरूपी शत्रू दोघेही जाहीरपणे एकमेकांना मिठ्या मारत असताना स्वस्थ बसून कसे चालेल? या घडामोडींकडे डोळसपणे पाहतानाच रशियाचे ‘पाकडे’ पाऊल पुन्हा हिंदुस्थानकडे कसे वळेल याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा.