आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप, श्रेयाने थायलंडमध्ये फडकवला तिरंगा

सामना प्रतिनिधी, मुंबई

१३ वर्षांच्या मराठमोळ्या श्रेया जाधवने सातासमुद्रापार थायलंडमध्ये हिंदुस्थानचा तिरंगा दिमाखात फडकवला. परेल येथे राहणाऱ्या या कन्येने आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये १३ वर्षांच्या वयोगटात सुवर्ण पदकाला गवसणी घालत महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.

शरीरसौष्ठव या खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे संदीप जाधव यांचे बंधू नितीन जाधव यांची श्रेया ही कन्या. सध्या हिंदुस्थानात स्त्री संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. याच पार्श्वभूमीवर नितीन जाधव यांनी आपल्या मुलीला लहानपणापासूनच स्त्री संरक्षणाचे धडे मिळावेत यासाठी तायक्वांदो या खेळामध्ये पाठवले. त्यानंतर वयाच्या चौथ्या वर्षापासून श्रेया भास्कर करकेरा यांच्या बी. के. ऍकॅडमीत तायक्वांदो या खेळाचे बारकावे आत्मसात करतेय. यावेळी तिला प्रेम, तन्वी व सिद्धेश यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते आहे. श्रेया डीपीवाय या शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत असून यावेळी अभ्यास व क्रीडा या दोघांची योग्य सांगड घालण्यात ती यशस्वी ठरत आहे.

स्वबळावर वाटचाल
तायक्वांदो या खेळाकडे सरकारचे लक्ष नाही अशी खंत नितीन जाधव यांनी बोलून दाखवली. नितीन जाधव यांनी स्वत:कडचे पैसे खर्च करीत श्रेयाचा थायलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग निश्चित केला. आतापर्यंत नितीन जाधव यांनी श्रेयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले आहे. मात्र सरकारपासून कॉर्पोरेट सेक्टरपर्यंत सर्वांनीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे त्यांना वाटते. या सर्वांच्या पुढाकाराने युवा खेळाडूंना उत्तुंग भरारीसाठी बळ मिळेल.

आता कॉमनवेल्थ, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचेय…
तायक्वांदोमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला या खेळाकडे तेवढेसे गांभीर्याने बघितले गेले नाही. पण एका स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्यानंतर श्रेयासह कुटुंबीयांना या खेळाची ओढ, कुतूहल वाटू लागले. गेल्या चार वर्षांमध्ये डीएसओ स्पर्धेत सुवर्ण पदकांवर मोहोर उमटवत श्रेयाने या खेळामध्ये आपला दबदबा निर्माण केलाय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणाऱ्या श्रेयाला आता कॉमनवेल्थ व ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून द्यायचेय आहे.