इंटर्नशीप करताना…


अनेक महाविद्यालयात इंटर्नशिप हा अभ्यासक्रमाचा भाग असतो. यातून कामाचे व्यावसायिक स्वरूप लक्षात येते.

महाविद्यालयीन जीवन हे नोकरीपेक्षा वेगळे असते. नुकतेच एखादे व्यावसायिक शिक्षण संपवून जेव्हा तरुण-तरुणी प्रत्यक्ष नोकरी करण्याकडे वळतात तेव्हा त्यांच्यात काही सकारात्मक बदलांची आवश्यकता असते. यासाठी विद्यार्थ्यांना निवडलेल्या करीयरच्या मार्गात इंटर्नशिप करणे महत्त्वाचे ठरते. कारण यावेळी त्यांना कार्यालयातील सहकाऱयांच्या संपर्कात राहून काम करताना विकसित व्हायला मदत होते. याचा प्रत्यक्ष नोकरी, व्यवसाय करताना फायदा होतो.

यादरम्यान कामाचे स्वरूप शिकायला मिळते. महत्त्वाचे म्हणजे कार्यालयीन वातावरणात स्वतःला कसे सांभाळायचे, वागायचे हे कळते. नियम पाळण्याची सवय लागते. आपण निवडलेल्या विषयात कौशल्य मिळवण्यासाठी इंटर्नशिपची मदत होते. शिवाय कार्यालयात काम करणारे सहकारी एकमेकांशी कसे बोलतात, त्यांचे मैत्रीपूर्ण व्यवहार अशा गोष्टीही शिकायला मिळतात.

व्यवस्थापकीय क्षेत्र
या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसतो. हा अनुभव घेण्याची संधी कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करताना मिळते. विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजित अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी विपणन, अर्थ, मनुष्यबळ विकास, उत्पादन व सेवा, माहिती तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय व्यापार, संशोधन पद्धती या विषयांची तोंडओळख झालेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांत इंटर्नशिप करता येते.

शैक्षणिक क्षेत्र
बीएड. शिकणाऱया विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा इंटर्नशिप करावी लागते. त्यांनी निवडलेल्या विषयानुसार यामध्ये रोज एक पाठ तयार करणे, एक ‘केस स्टडी’ करणे यामध्ये त्या विद्यार्थ्यामध्ये इतरांपेक्षा काय वेगळी गुणवैशिष्टय़े आहेत, त्यांच्या पालकांशी बोलणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतात. हा इंटर्नशिपचा एक भाग असतो.

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्र
अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवी मिळवल्यानंतर नोकरी मिळण्याच्या आधी दोन महिन्यांची इंटर्नशिप करावी लागते. याद्वारे उद्योग आणि कॉर्पोरेट जगतात शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष काम करताना अमलात आणाव्या लागतात. यामुळे तांत्रिक ज्ञानाबरोबरच उद्योग क्षेत्राची ओळख होते. त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातही इंटर्नशिप करणे अनिवार्य आहे.

स्वीकारताना…
-इंटर्नशिपची संधी देणारी संस्था/ कंपनी आणि त्यातील कामाचे स्वरूप हे आपण निश्चित केलेल्या करीयर क्षेत्राशी निगडित आहे का, हे तपासून घ्या.
– संस्थेची/कंपनीची वैधता आणि विश्वासार्हता यांची आपल्या महाविद्यालयाकडून किंवा अन्य मार्गाने पडताळणी करा.
– इंटर्नशिपचा कालावधी, ठिकाण, तिथे जाण्या-येण्यासाठी लागणारा वेळ, वाहनाची उपलब्धता यांची माहिती घ्या. शक्यतो घराच्या जवळपास किंवा महाविद्यालयाजवळची कामाची जागा निवडणे योग्य ठरते. यामुळे वेळेची बचत होऊ शकेल.
– इंटर्नशिपनंतर अनुभवाचे प्रमाणपत्र घ्या.
– कामाचा आर्थिक मोबदला किती मिळेल हा विचार न करता प्रामुख्याने कामाच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करा.

कशी मिळवाल?
– शिक्षण घेत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून विविध कंपन्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतो.
– बहुतेक कंपन्यांच्या संकेतस्थळावर ‘करीयर्स’ या विभागामध्ये इंटर्नशिपबाबत माहिती दिलेली असते. संधी कशी आहे, कामाचे स्वरूप, अर्ज कसा करायचा अशी माहिती येथे मिळू शकते.
– काही कंपन्यांमध्ये उन्हाळी आणि हिवाळी अशा दोन टप्प्यांत दोन-दोन महिन्यांची इंटर्नशिप असते, तर काही सलग पाच महिनेही इंटर्नशिप ठेवतात.

का करावी?
– पुस्तकी अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव इंटर्नशिप केल्यामुळे मिळतो. प्रायोगिक स्तरावरील माहिती यामुळे होते.
– महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था यापेक्षाही कामाच्या वेळांचे पालन करणे महत्त्वाचे असते. इंटर्नशिपमुळे वेळ पाळण्याची सवय लागते.
– इंटर्नशिप करताना दररोज वरिष्ठांकडून मिळालेले काम त्याच दिवशी पूर्ण करणे गरजेचे असते. म्हणून इंटर्नशिपमुळे हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण करण्याची प्रामाणिकपणे काम करण्याची सवय लागते.
– कोणाशी कसे बोलावे, किती बोलावे, बोलताना कसे शब्द वापरावेत अशा प्रकारे संभाषण कौशल्यही इंटर्नशिपमुळे आत्मसात होते.