हिरे व्यापारी नीरव मोदीच्या बहिणीला इंटरपोलची नोटीस

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटींच्या कर्जघोटाळा प्रकरणातील फरारी आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदी हिच्याविरोधात मनी लॉण्डरिंग गुह्यात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटसाठी जारी केली जाते.

पूर्वी दीपक मोदी (44) हीमनी लॉण्डरिंग प्रकरणात हिंदुस्थानी तपास यंत्रणेला हवी आहे. पूर्वी मोदी हिचा पती मयंक मेहता यालाही यापूर्वी ईडीने नोटीस बजावली आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या कर्जघोटाळय़ातून मिळालेल्या 133 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 950 कोटी रुपये) रकमेचा लाभ पूर्वी मोदी हिने घेतला आहे. या घोटाळय़ातील पैसा इतरत्र नेण्यात तिचा हात आहे, असा अंमलबजावणी संचालनालयाचा आरोप आहे.

संयुक्त अरब अमिराती (यूएई), ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स आणि सिंगापूर आदी ठिकाणच्या बोगस कंपन्यांत पीएनबी घोटाळय़ाचा पैसा गुंतविण्यात आला आहे. पूर्वी मोदी ही त्या बोगस कंपन्यांची मालक आणि संचालक होती.
मुंबईतील ब्रँडी हाऊस येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत झालेल्या कर्जघोटाळाप्रकरणी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात अंमलबजावणी संचालनालयाने तिचे नाव आरोपींच्या यादीत समाविष्ट केले आहे.

मॉन्टेक्रिस्टो ट्रस्ट, इथका ट्रस्ट, न्यूझीलंड ट्रस्ट या नावाने काही ट्रस्टमध्ये मोदी हिने पीएनबी घोटाळय़ातील पैसा गुंतविला आहे. बार्बाडोस, मॉरिशस, स्वित्झर्लंड, सिंगापूर, ब्रिटन आणि हॉगकाँग आदी देशांतील बँकांत तिच्या नावावर अनेक खाती आहेत. पूर्वी मोदी ही बेल्जियमची नागरिक असून, इंटरपोलच्या नोटीसनुसार तिला इंग्लिश, गुजराती आणि हिंदी भाषा येतात.