रंगभूमीपासूनच सुरुवात


सामना प्रतिनिधी । मुंबई

‘ओवी’ या हॉरर नाटकाद्वारे गौरी इंगवले या बाल अभिनेत्रीने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलंय. यानिमित्त…

रहस्यमय, थरारजन्य अनुभव देणारे ‘ओवी’ हे नाटक नुकतेच रंगभूमीवर सादर झाले. भीती ही व्यक्तिच्या प्रगतीतला अडथळा असून तिला जे साध्य करायचं असतं ते भीतीच्या पलीकडे आहे. या विचारावर भाष्य करणाऱया या नाटकात ‘ओवी’ या व्यक्तिरेखेची अनेक रुपं प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

२०१७ साली सादर झालेली ही एकांकिका आता दोन अंकी नाटकात रंगभूमीवर आली आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अश्वमी थिएटर्सने या नाटकाची निर्मिती केली असून बाल अभिनेत्री गौरी इंगवले आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.

आपल्या पहिल्या नाटकाच्या अनुभवाविषयी गौरी सांगते, याआधी मी नाटकात कधीच काम केलं नव्हतं. ‘कुटुंब’ सिनेमानंतर पहिल्यांदाच मला या नाटकाद्वारे रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे नाटक आणि सिनेमातला फरक जवळून अनुभवता आला. नाटकासारख्या जिवंत कलेत ओवीची अनोखी, निरागस व्यक्तिरेखा साकारताना मजा आली. भविष्यात सिनेमा आणि नाटक दोन्हीही माध्यमात काम करायला आवडेल.
नव्या अनुभवामुळे नाटकातील कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती. त्यामुळे शिकायलाही भरपूर मिळालं. इतर कलाकारांनीही खूप मदत केली. हेमांगी ताई प्रत्येक दृष्य स्वतः करून दाखवायची आणि माझ्याकडून करून घ्यायची. त्यातील बारकावे सांगायची. अनिकेत दादानेही एखादी भूमिका साकारण्याविषयी बरेच सल्ले दिले.

‘ओवी’ या व्यक्तिरेखेची वेगवेगळी रूप यामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतात. तिची निरागस, तिच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू याद्वारे तिची अनेक रूपं यामध्ये बघायला मिळतात. घडलेल्या घटनांचा तिच्यावर कसा परिणाम होतो. याचा थरारक अनुभव प्रेक्षकांना या नाटकाद्वारे घेता येईल, असे ती आपल्या व्यक्तिरेखेविषयी सांगते.

अभिनेता म्हणून बाबांची कशी मदत झाली, असे विचारल्यावर ती सांगते, बाबांनी मला सांगितलं तुला नाटकात करायचं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी केलं. त्याचबरोबर त्यांनी मार्गदर्शनही केलं. शिवाय नाटकातील संवाद कसे बोलायचे हेही त्यांनी मला शिकवलं. त्यांच्या सांगण्याप्रमाणे फक्त मी करत गेले. तसेच यापुढे काय करणार हे काहीच ठरवलेलं नाही, कारण अजून मी खूप लहान आहे.

हॉरर नाटकाची भीती
नाटकाविषयी जेव्हा मला कळलं तेव्हा भीती वाटली होती. कारण भुताचे सिनेमे बघायला आवडत असले तरी तेवढीच मी घाबरतेसुद्धा. त्यातही हे माझं पहिलंच नाटक आणि तेही घाबरवणारं, भीती वाटणारं… नेहमीपेक्षा जरा वेगळं. शिवाय कुठल्याही नाटकाचं आधी वाचन त्यानंतर तालीम होते, पण या नाटकाच्या बाबतीत असं काही झालंच नाही. तरीही सर्वांच्या सहकार्याने नाटक रंगभूमीवर सादर झालंच, असं गौरीचं म्हणणं आहे.